सरलेल्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय निवृत्तीवेतन निधीच्या (एनपीएस) मालमत्तेत ३८ टक्के वाढ झाली आहे.

राष्ट्रीय निवृत्तीवेतन निधीचे अध्यक्ष सुप्रतिम बंदोपाध्याय यांनी एका दूरसंवादी पत्रकार परिषदेत आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या प्रगतीचा आढावा घेतला.

वर्षअखेरीस ‘एनपीएस’ खातेधारकांची संख्या ४.२४ कोटींवर पोहोचली असून राष्ट्रीय निवृत्ती निधीच्या मालमत्तेने ५.७८ लाख कोटींचा टप्पा गाठल्याचे त्यांनी सांगितले.

सरलेल्या आर्थिक वर्षात अशासकीय कर्मचाऱ्यांनी १६.४७ लाख तर ११.२५ लाख कंपनीप्रणित सदस्यांनी ‘एनपीएस’ खाती सुरू केली.

एका आर्थिक वर्षात सुरू केलेल्या खात्यांची संख्येने विक्रमी टप्पा गाठला आहे. मागील आर्थिक वर्षातील मोठा कालखंड टाळेबंदीने बाधित होऊनदेखील ‘एनपीएस’ खात्यांच्या वृद्धीदरावर याचा परिणाम झाला नसल्याचे बंदोपाध्याय यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, करोनाने लोकांना जीवनाची क्षणभंगुरता कळून आली आणि टाळेबंदीमुळे आर्थिक सुरक्षिततेचे महत्त्व पटले. तसेच खाते उघडण्यासाठी खातेधारकाची ओळख पटविण्यासाठी आधारसंलग्न भ्रमणध्वनिवर ‘ओटीपी’चा वापर केल्याने खाते उघडण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडते. याचबरोबर, ओळख पडताळणीनंतर ‘थर्ड पार्टी ऑनबोर्डिंग’, ‘इ-एक्झिट’, ‘इ-नाम’ निर्देशन, खाते बंद करण्याची प्रक्रिया, ऑनलाईन पडताळणी या तंत्रस्नोही उपाययोजना खातेधारकांची संख्या वाढण्यास कारण ठरल्याचे त्यांनी सांगितले.

‘करोना’मुळे गेल्या वर्षी ‘एनपीएस’ खातेधारकांची संख्या वाढविणे हे खूपच कठीण होते; परंतु आम्ही अशासकीय ग्राहकांच्या संख्येमध्ये २४% वाढ करू शकलो. राष्ट्रीय निवृत्ती निधीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेवर १० टक्के परतावा ही गोष्ट कौतुकास्पद आहे. असेही ते म्हणाले.

नोंदणीधारकांमध्ये सर्वाधिक प्रमाण ३१ ते ४५ वयोगटातील खातेधारकांचे असल्याचेही या आकडेवारीवरून स्पष्ट होते.