‘नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि.’च्या (एनएसईएल) ५६०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने पाच आरोपींविरुद्ध तब्बल नऊ हजार ८०० पानांचे आरोपपत्र सोमवारी विशेष न्यायालयात दाखल केले. या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र गुंतवणूकदार हितरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करणे पोलिसांना शक्य होणार आहे. या वस्तू बाजारमंचाचे  मुख्य प्रवर्तक असलेले जिग्नेश शाह यांचे आरोपपत्रात नाव नसले तरी त्यांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचेही एका आयपीएस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
या आरोपपत्रात अटक करण्यात आलेले आरोपी तसेच पोलिसांना हव्या असलेल्या आरोपींच्या मालमत्तेची सविस्तर यादी देण्यात आली आहे. मात्र पाहिजे असलेल्या आरोपींेची नावे जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकरणी तपास पूर्ण झालेला नाही. या प्रकरणी आणखी काही पुरवणी आरोपपत्र दाखल केली जातील. त्यामुळे या घोटाळ्यातील काही संबंधितांवर कारवाई झालेली नाही, त्यांनी आपल्याला मोकळीक मिळाली आहे, अशा अविर्भावात राहू नये, असे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी कोणाचेही नाव न घेता सांगितले.
आरोपपत्रात घोटाळ्याच्या संपूर्ण कार्यपद्धतीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. व्यवस्थापनातील उच्चपदस्थांनी थकबाकीदारांशी संगनमत करून कसा घोटाळा केला आहे तसेच कर्जदार कंपन्यांना कसे बनावट संचालक करण्यात आले याची माहितीही त्यात असल्याचे रॉय यांनी सांगितले. याशिवाय विविध कंपन्यांनी बनावट नोंदी करून कशी अफरातफर केली हेही यात नमूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल
* अंजनी सिन्हा, निलंबित मुख्याधिकारी
* अमित मुखर्जी, निलंबित उपाध्यक्ष
* जय बहुखुंडी, निलंबित उपाध्यक्ष
*  नीलेश पटेल, व्यवस्थापकीय संचालक, एनके प्रोटिन्स
* अरुण शर्मा, लोटस रिफायनरीज्/ चित्रपट अर्थपुरवठादार
(हे सर्व आरोपी सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.)