राज्यभरातून ४० हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग

मुंबई : केंद्र सरकारच्या विविध कामगारविरोधी धोरणांना विरोधासाठी विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या एक दिवसाच्या बंदमुळे आर्थिक राजधानीतील व्यवहार मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाले.

बंदमध्ये सहभागी प्रामुख्याने डाव्या संघटनांच्या सदस्यांमुळे बँकांच्या कामकाजावर विपरीत प्रभाव जाणवला. परिणामी, मुंबईतील सरकारी बँकांमधील व्यवहार ठप्पच होते.

राज्यातील बँकांमधील ४०,००० हून अधिक कर्मचारी सहभागी झाल्याचे बँक संघटनांनी म्हटले आहे. याशिवाय १०,०००  बँक अधिकारी संपात सहभागी झाले होते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या कर्मचारी संघटनेचाही बुधवारच्या बंदमध्ये सहभाग होता.

रेल्वे, बस, टॅक्सी, रिक्षा तसेच सागरी मार्गाने होणारी वाहतूक नियमित सुरू असल्याने त्याचा वाहतुकीवर फार परिणाम जाणवला नाही. बंदरे तसेच विमानतळावरील वाहतूकही नियमितपणे सुरू होती. बँक क्षेत्रातील सहा संघटना बंदमध्ये सहभागी होत्या. देशाच्या वाहन निर्मिती, पोलाद उत्पादन क्षेत्रावर परिणाम जाणवला.

सार्वजनिक कंपन्यांचे खासगीकरण, ढासळती अर्थव्यवस्था, नागरिकत्व सुधारणा कायदा या धोरणांना विरोध करण्यासाठी देशभरातील विविध कामगार, कर्मचाऱ्याचे नेतृत्व करणाऱ्या १० हून अधिक राष्ट्रीय संघटनांनी बुधवारच्या एक दिवसाच्या आंदोलनाची घोषणा केली होती.