News Flash

शेडनेट तंत्रज्ञानातून ‘नॅचरल’ची क्रांती

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर करून ३० गावात ‘शेडनेट’द्वारे टोमॅटोचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांच्या जीवनात आíथक क्रांती घडवणारा देशातील सामूहिक शेतीचा पहिला प्रयोग रांजणी येथील नॅचरल शुगर

| July 26, 2014 01:18 am

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर करून ३० गावात ‘शेडनेट’द्वारे टोमॅटोचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांच्या जीवनात आíथक क्रांती घडवणारा देशातील सामूहिक शेतीचा पहिला प्रयोग रांजणी येथील नॅचरल शुगर या खाजगी साखर कारखान्याच्या पुढाकाराने होत आहे. या प्रयोगाबद्दल कौतुक असेही की त्याने तरुणांना शेतीकडे आकृष्ट केले आहे.
वारंवार होणाऱ्या अवर्षणामुळे उसाची शेती संपत चालली आहे. अन्य पिकातून कुटुंबाची गुजराण करता येईल इतकेही उत्पन्न मिळत नसल्यामुळे नव्या पिढीतील तरुण शेतीकडे पाठ फिरवत आहेत. तरुणांना शेतीबद्दल आकर्षण निर्माण व्हावे यासाठी रांजणी साखर कारखान्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी पुढाकार घेऊन कारखाना परिसरातील तीस गावात ४० शेडनेट उभारून टोमॅटोचे उत्पादन घेतले असून टोमॅटोला मिळणाऱ्या सध्याच्या भावामुळे तरुणांमध्ये शेतीबद्दलचा आत्मविश्वास निर्माण होतो आहे.
लातूर, उस्मानाबाद हा परिसर अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो. गेल्या दोन वर्षांपासून धनेगाव धरणातील पाण्याची पातळी जोत्याखालीच आहे व धरणातील १०० टक्के पाणी पिण्यासाठी आरक्षित करावे लागत असल्यामुळे शेतीला पाणीच उपलब्ध होत नाही. परिणामी उसाचे क्षेत्र अतिशय वेगाने घटत आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याकडे कल असला तरी यावर उपाय सापडत नव्हता. जानेवारी २०१४ पासून नॅचरल शुगरचे ठोंबरे यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा सुरू केली. बरोबरीने शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी करावा यासाठी शेडनेट तंत्रज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला.
प्रारंभिक अंदाज घेऊन पहिल्या टप्प्यात निवडक ४० शेतकऱ्यांच्या शेतात शेडनेट उभारण्याची योजना आखली गेली. एप्रिलमध्ये शेडनेट उभारणी सुरू झाली व मेमध्ये सर्व ४० शेडनेटमध्ये टोमॅटोची लागवड केली. टोमॅटो लागवड करत असताना बाजारपेठेत दोन रुपये किलोने टोमॅटो विकले जात होते. देशातील मोठय़ा बाजारपेठांचा गेल्या दहा वर्षांचा टोमॅटो, सिमला मिरची, कांदा व बटाटा याच्या भावाचा व कालावधीचा अभ्यास करून ही लागवड करण्यात आली. सर्वाना लागवडीचे तंत्रज्ञान, माती तपासणी, पाणी तपासणी, खते व औषधाची मात्रा यासंबंधीचे मार्गदर्शन देण्यात आले. दर १५ दिवसांनी यातील तज्ज्ञ मंडळींनी प्रत्येक शेडनेटला भेट देऊन व पाहणी करून पुढील १५ दिवसांचे वेळापत्रक सांगितले.
गेल्या अडीच महिन्यात सर्व शेडनेटमध्ये अतिशय उत्तम टोमॅटो लागले आहेत. एका शेडनेटमधून किमान २० टन उत्पादन होईल असे गृहीत धरले आहे. शेतकऱ्यांनी सामूहिकपणे विक्रीसाठी टोमॅटो एका जागी आणून त्यानंतर ते दिल्ली, नागपूर, बंगळुरू, हैदराबाद आदी बाजारपेठेत पाठवले जातील. येत्या १ ऑगस्टपासून टोमॅटो विक्रीसाठी जाणार आहेत. किमान अडीच महिने टोमॅटोचे उत्पादन मिळेल.
एखाद्या साखर कारखान्याने पुढाकार घेऊन एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शेडनेट उभारून शेतकऱ्यांच्या मालाची विक्री करण्याची हमी देण्याची यंत्रणा देशात प्रथमच उभी राहते आहे. सर्वाधिक पाणी पिणाऱ्या उसाऐवजी पर्यायी पीक घेऊन शेतकऱ्यांच्या जीवनात आíथक क्रांती घडविणारा रांजणी परिसरात उभारलेला हा प्रकल्प देशातील संस्थांसाठी नक्कीच पथदर्शी आहे. या प्रकल्पाची यशस्विता मार्गी लागल्यानंतर दरवर्षी शेडनेटधारकांच्या संख्येत वाढ करण्याचा ठोंबरे यांचा संकल्प आहे.
तरुण शेतीकडे वळेल का?
२० गुंठे क्षेत्रावर शेडनेट उभारणीसाठी ५ लाख रुपये खर्च येतो. शेतकऱ्याने ५० हजार रुपये गुंतवणूक केली तर उर्वरित रक्कम बँकेकडून कर्जाऊ घेता येईल. तथापि प्रश्न होता की, सामूहिकपणे उत्पादन घेण्यासाठीचे मार्गदर्शन व उत्पादित केलेला माल विक्री करण्याची यंत्रणा उपलब्ध केली तर तरुण शेतीकडे वळेल का? नोकरी केल्याप्रमाणे आठ तास शेतीत लक्ष दिले तर समाधानकारक पगार मिळू शकतो इतके उत्पादन होईल, असे सांगितल्यानंतर कारखान्याकडे शेकडो शेतकऱ्यांनी ‘या उपक्रमात आम्हाला सामावून घ्या’ अशी विनंती केल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. लागवड करताना १० रुपये किलो असा भाव टोमॅटोला मिळेल असे गृहीत धरले होते. सध्या बाजारपेठेत ५० रुपये किलो हा भाव पाहता अध्र्या एकरात सरासरी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. वर्षभरात शेडनेटमध्ये दोन ते तीन पिके घेता येतात. त्यामुळे शेतकऱ्याला अतिशय उत्तम पसे मिळू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 1:18 am

Web Title: natural revolution through shade net house technology
Next Stories
1 नफावसुलीमुळे शेअर बाजाराची सर्वोच्च स्थानापासून फारकत!
2 ‘केडीजे हॉलिडेस्केप्स अ‍ॅण्ड रिसॉर्ट्स’ची राज्यात १५० कोटींची गुंतवणुकीची योजना व्यापार प्रतिनिधी, मुंबई
3 ठाकरे कुटुंबियांच्या शेअर गुंतवणुकीला बरकतीचे वावडे
Just Now!
X