क्लालिटी लिमिटेडच्या खरेदीचा हल्दिराम स्नॅक्सने सादर केलेल्या सुधारित प्रस्तावाचा विचार करण्याचे निर्देश राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण अर्थात ‘एनसीएलटी’ने शुक्रवारी बँकांना दिले.

विविध बँकांचे १,९०० कोटी कर्ज असलेल्या दुग्धजन्य उत्पादन क्षेत्रातील क्वालिटी लिमिटेडची नादारी व दिवाळखोरी संहितेंतर्गत विक्री प्रक्रिया सुरू आहे. यासाठी हल्दिराम स्नॅक्सने १४५ कोटी रुपयांचा खरेदी प्रस्ताव क्वालिटी लिमिटेडला कर्ज देणाऱ्या बँकांना सादर केला आहे.

यापूर्वीचा हल्दिराम स्नॅक्सचा १४२ कोटी रुपयांचा प्रस्ताव बँकांनी नाकारल्यानंतर तो नव्याने अधिक रकमेसह सादर करण्यात आला. याबाबत न्यायाधिकरणाच्या दिल्ली खंडपीठाने कंपनी नादारी तिढा निराकरण कालावधी तीन आठवडय़ांनी वाढविण्याचेही आदेश दिले.

क्वालिटी लिमिटेडला कर्ज देणाऱ्या बँका, वित्तसंस्थांच्या वतीने केकेआर या गुंतवणूक कंपनीने २०१८ मध्ये थकीत कर्जाबाबत दिवाळखोरी प्रक्रिया सुरू केली होती. याकरिता इवाय या आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनीचे शैलेंद्र अजमेरा यांची तिढा निराकरण व्यावसायिक म्हणून नियुक्ती करण्यात आली. हल्दिराम स्नॅक्सच्या यापूर्वीच्या १४२ कोटी रुपयांच्या क्वालिटी लिमिटेड खरेदीच्या प्रस्तावाला ६६ टक्के मंजुरी आवश्यक असताना बँकांच्या पतपुरवठा समितीच्या सदस्यांचे ४० टक्केच मत बाजूने पडले होते. परिणामी, हल्दिरामने सुधारित आराखडा सादर केला.