08 March 2021

News Flash

सोने तारण कर्ज : आवश्यक खबरदारी

प्रत्येक बँकेकडून सोने तारण कर्जासाठी आकारले जाणारे व्याजाचे दर हे वेगवेगळे असतात.

संजय राजोरिया

विविध मालमत्ता वर्गाच्या तुलनेत सोन्याला असलेले सुरक्षितता आणि शाश्वतेचे कोंदण हे त्याचे वेगळेपण भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणूकदारांनीही मान्य केले आहे. तज्ज्ञ विश्लेषकांचे कयास आहेत की, जगभरातच मंदावलेली अर्थव्यवस्था आणि देशांतर्गत चलनवाढीच्या भडक्याची जोखीम पाहता, भारतात सोन्याच्या किमती चालू वर्षांत आणखी १० टक्क्यांनी वाढू शकतील.

केपीएमजी या बाजार-विश्लेषण संस्थेच्या अहवालाप्रमाणे, भारतातील सोने तारण कर्ज बाजारपेठ मागील तीन तीन वर्षे सरासरी वार्षिक १३.७ टक्के वाढीसह २०२० सालाच्या अखेरीस ३,१०,१०० कोटी रुपयांवर जाईल. भारत हा जगातील सोन्याची सर्वाधिक मागणी असलेली देश असून, देशातील एकूण सुवर्णसंचय २३ हजार टनांहून अधिक आहे.

सोन्याच्या वाढत्या किमतीच्या बरोबरीने गेल्या काही वर्षांत भारतातील सोने तारण कर्ज बाजारपेठही दमदार वाढ दर्शवीत आहे. छोट्या मोठय़ा गरजा भागवण्यासाठी अल्पावधीसाठी भासणारी पशाची गरज ही सोने बँका अथवा गावातील सावकारकडे गहाण ठेवून लोक भागवत आले आहेत आणि आजही अशा कर्जाचे प्रमाण हे गृहकर्ज आणि वैयक्तित कर्जाच्या तुलनेत अधिक आहे. आता अनेक बँकांनी सोने तारण कर्जाच्या विशेष योजना आणून, छोटी शहरे आणि गावातील सावकारशाहीला उत्तम प्रकारे मात दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे वैयक्तिक कर्जाच्या (पर्सनल लोन) तुलनेत सोने तारण कर्जाचे व्याजाचे दर खूपच कमी असतात. शिवाय अशा कर्जफेडीसाठी अनेकविध लवचिक पर्याय कर्जदारांना मिळतात. याच कारणाने दक्षिण भारतात सोने तारण कर्जाचा सर्वाधिक ४० टक्के इतका वाटा आहे.

प्रत्येक बँकेकडून सोने तारण कर्जासाठी आकारले जाणारे व्याजाचे दर हे वेगवेगळे असतात. हे व्याजाचे दर बँक आणि वित्तीय संस्थेनुरूप वार्षिक ९ टक्के ते २५ टक्के या दरम्यान काहीही असू शकतात.  रिझव्‍‌र्ह बँकेने ज्याला ‘एलटीव्ही’च्या म्हणजे गहाण ठेवल्या सोन्याच्या मूल्याच्या ७५ टक्क्यांइतके रकमेचे कर्ज बहाल करण्याला परवानगी दिली आहे. काही बँका तर कमाल २० लाख रुपयांपर्यंतचे सोने तारण कर्ज आकर्षक व्याजदराच्या पर्यायासह आणि कोणत्याही प्रक्रिया शुल्काविना, तत्पर आणि वैयक्तिककृत सेवा बहाल करून लोकांना प्रदान करतात. या कर्ज प्रकाराला वाढती मागणी पाहता, उत्तरोत्तर अनेक बँका नव्याने या व्यवसायात प्रवेश करीत आहेत.

(लेखक एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँकेचे उप-महाव्यवस्थापक आहेत)

लक्षात घ्यावयाच्या बाबी :

१.   सोने तारण कर्ज घेण्यापूर्वी विविध बँकांचे व्याजाचे दर तपासून तुलनात्मक आढावा घ्यावा.

२.   अनेक बँका अशा कर्जासाठी ०.२० ते २ टक्के प्रक्रिया शुल्क आकारतात. अपेक्षित कर्जाची रक्कम मोठी असेल तर प्रक्रिया शुल्कापोटी मोठा भुर्दंड तर बसणार नाही ही काळजी महत्त्वाची. त्यामुळे विशेष योजना म्हणून प्रक्रिया शुल्क-माफी अथवा सवलत देणाऱ्या बँकांना प्राधान्याने विचारात घ्यावे.

३.   असे कर्ज मुदतपूर्व फेडल्यास, तर काही बँका जर सहा महिने उलटण्याच्या आत कर्ज फेडायचे झाल्यास, शिल्लक रकमेवर २ टक्के शुल्क आकारतात. त्यामुळे मुदतपूर्व परतफेडीवर कोणतीही शुल्कवसुली नसलेल्या बँकांना प्राधान्य द्यावे.

४.   त्याचप्रमाणे अर्ज करतेवेळीच मुदतपूर्व परतफेडीचा पर्याय काही बँका उपलब्ध करून देतात, तो असल्यास कर्जदाराने स्वीकारणे केव्हाही श्रेयस्कर.

५.   अनेक बँका परतफेडीचे अनेक लवचिक पर्याय कर्जदारांना देतात. ज्यात मासिक समान हप्ते (ईएमआय), व्याज रकमेचा आगाऊ (अपफ्रंट) भरणा, मुद्दलाचे बुलेट रिपेमेंट वगरेंचा समावेश आहे. काही बँका तर प्रत्येक महिन्याच्या प्रारंभी केवळ व्याज रकमेचा भरणा करण्याची तर मुद्दलाची रक्कम मुदतपूर्तीला चुकती करण्याचा पर्याय देतात. प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीनुरूप योग्य त्या पर्यायाची निवड महत्त्वाची ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 1:46 am

Web Title: necessary precautions for gold mortgage loan zws 70
Next Stories
1 सेबी अध्यक्ष त्यागी यांना मुदतवाढ
2 शेअर बाजाराला ‘कोरोना’ची लागण; साडेपाच लाख कोटी बुडाले
3 पडझड सत्र सुरूच
Just Now!
X