मंगळवारी शेअर बाजार दणक्यात आपटला. निर्देशांकांतील ३ टक्क्य़ांच्या हानीने गुंतवणूकदारांच्या ३ लाख कोटी गुंतवणूक मूल्याचा चुराडा केला. २००८ आणि २०१३ सालातील कटू अनुभव गाठीशी असताना, सर्व पूंजी एकाच मालमत्ता पर्यायात एकवटणे सूज्ञपणाचे नाही, हे पटवून देत गुंतवणूक वैविध्यातून यशाचा मंत्र सांगणारा लेख..

सेन्सेक्स सार्वकालिक उच्चांकाला, तर १० वष्रे मुदतीच्या रोख्यांचा परताव्याचा दरही आकर्षक स्तरावर.. ही स्थिती गुंतवणूकदारांमध्ये चलबिचल निर्माण करणारी जरूरच आहे. पसा घालावा तर तो शेअर बाजारात की रोखे बाजारात अथवा दोन्हींमध्ये घालायचा तर किती प्रमाणात? असे प्रसंग सरळमार्गी गुंतवणूकदारालाही विशिष्ट किंमत स्तराचा पाठलाग करणाऱ्या सट्टय़ाकडे झुकवणारे असतात. काही प्रसंगी हा सट्टा फळताना दिसतोही. पण फलदायी गुंतवणुका केवळ सट्टा किंवा अनुमानावर विसंबून नव्हे तर र्सवकष व विविधांगी (डायव्हर्सफिाइड) पोर्टफोलियो उभारून केल्या जायला हव्यात. असेच मोठय़ा अपेक्षांचे पूल बांधत, २००७ साली शेअर बाजार सर्वोच्च स्तराला असताना गुंतवणूकदारांनी आपली सर्व पुंजी त्यात ओतली आणि २००८ सालच्या जागतिक वित्तीय अरिष्टाच्या संकटात गडगडलेल्या बाजाराने ती धुऊन टाकली. रोखे बाजारावर संपूर्ण भिस्त ठेवणाऱ्यांना २०१३ सालात असाच कटू अनुभव डेट म्युच्युअल फंडांच्या पडझडीने दिला. बहारदार पूर्वकामगिरी या एकमेव निकषावर आधारित वर्तमानात घेतलेला गुंतवणूक निर्णय हा निश्चित सुज्ञपणाचा म्हणता येणार नाही. मग यावर उपाय काय? उपाय एकच करडय़ा शिस्तीने वेगवेगळ्या मालमत्ता वर्गात गुंतवणूक विभागून ती नियमित करीत राहणे हा होय.
मालमत्ता विभाजन (अ‍ॅसेट अलोकेशन) ही अशी गुंतवणूक-नीती आहे जी प्रत्येक व्यक्ती व कुटुंबाची जोखीम सोसण्याची क्षमता आणि त्यांच्या जीवनचक्रात आहेत त्यानुसार गुंतवणुकीची उद्दिष्टे आणि वित्तीय ध्येय लक्षात घेऊन त्यांची किती पुंजी कोणत्या गुंतवणूक पर्यायात असायला हवी, याची तड लावते. हे गुंतवणुकीचे पर्याय म्हणजे समभाग, सरकारी रोखे, सोने-चांदी यांसारख्या मौल्यवान जिन्नस अथवा रोकड होय. या प्रत्येक पर्यायाची परताव्याची कामगिरी प्रत्येक वेळी वेगवेगळी असते. म्हणून नफा-नुकसानीची मात्रा विभागली गेल्याने तुमच्या एकूण गुंतवणुकीतील जोखीमही साहजिकच कमी होते.
कोणत्याही गुंतवणुकीचा महत्त्वाचा रोख हा तुमची जोखीम सहन करण्याची क्षमता आणि आíथक ध्येयांवर एकवटलेला असावा आणि त्या आधारे गुंतवणूक पर्यायांची निश्चिती केली जायला हवी. एकदा ही निश्चिती झाली की त्याच्याशी कोणत्याही छेडछाडीविना किमान काही काळ इमान राखले जाणे आवश्यक ठरते. बाजारात अल्पावधीत दिसणाऱ्या चढ-उतारांनी हे इमान विचलित होता कामा नये.
देशांतर्गत आणि जागतिक अर्थकारण हे गतिमान बनले आहे. राजकीय, भू-राजकीय अथवा नसíगक कारणांमुळे अर्थकारणाचे रूप सारखे बदलत असते आणि त्यानुरूप विविध गुंतवणूक पर्यायांच्या कामगिरीवरही त्याचा परिणाम होत असतो. जर हे बदल विधायक असतील, तर कामगिरीत उभारी दिसते. त्या उलट बदल नकारार्थी असतील, तर गुंतवणुकीचे मूल्य उतरंडीला लागलेले दिसेल. एकाच समयी अनेक घटकांचा प्रभाव कार्य करीत असल्याने, प्रत्येक गुंतवणूक पर्यायाच्या परतावा कामगिरीचे एक चक्र बनत असल्याचे दिसून येते. सर्वच गुंतवणूक पर्याय एकाच समयी सारख्याच परताव्याच्या कामगिरीच्या चक्रात असल्याचे क्वचितच दिसून येते. म्हणूनच शेअर बाजार तेजीत असताना, सोन्याने लकाकी गमावलेली असते, तर कधी रोख्यांचा परताव्याचा दर हा शेअर बाजारालाही मात देणारा असतो. शिवाय अशीच स्थिती कायम राहते असेही नाही, नेमके याच्या उलट घडतानाही दिसते. म्हणून आपली गुंतवणूक पुंजी अत्यंत चलाखीने विविध पर्यायांमध्ये विभागली गेली पाहिजे. दीर्घ मुदतीत गुंतवणुकीतून चांगला परतावा देणारा हा यशाचा फॉम्र्युला ठरला असल्याचे विविध सर्वेक्षणानेही सिद्ध केले आहे.

यशाचे मंत्र
१. दीर्घ मुदतीचा दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करा
२. चिकाटीने गुंतवणूक शिरस्ता कायम ठेवा संयम ढळू देऊ नका
३. तुमच्या गुंतवणूक अथवा विक्री निर्णयात भावनेला वाव नको
४. सबुरीचे वर्तन असावे, अवाजवी चपळाई अथवा बाजाराचे टायिमग साधण्याचे साहस नको
५. प्रत्येक १२ महिन्यांनी गुंतवणूक भांडाराचा संतुलन व फेररचनेच्या दृष्टीने आढावा घ्या.
महत्त्वाची तत्त्वे
*आपली आर्थिक कुवत आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे यानुसार, गुंतवणूकयोग्य पुंजीचे विविध पर्यायांत सुयोग्य विभाजन करा
*स्व-कष्टार्जित पुंजी घालून पोर्टफोलियोसाठी निवडलेल्या गुंतवणूक पर्यायांबद्दल सर्व चाचपणी आणि अभ्यास असायलाच हवा.
*आपल्या गुंतवणूक भांडारापासून परताव्याचे लक्ष्य बेताचे असू द्यावे, जेणेकरून एकूण आर्थिक नियोजनाला ठोस आकार देता येतो. अपेक्षेपेक्षा जास्त लाभ झाल्यास ‘बोनस’च समजावा.
*पोर्टफोलियोवर नियमित लक्ष ठेवा आणि वर्षांतून एकदा आढावा घ्या.

*समभाग, सोने आणि रोखे या तिन्ही पर्यायातून गेल्या २० वर्षांतील सरासरी आवर्ती परतावा हा सारखाच ११-१२ टक्क्य़ांच्या घरातील आहे. मुख्य म्हणजे तो महागाई दरावर मात करणारा निम्न जोखीम घेत मिळविलेला परतावा आहे.

– सुधांशू अस्थाना
*लेखक अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक (इक्विटी)