रिलायन्स इंडस्ट्रीजने तिची उपकंपनी रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून औषधांच्या विक्रीचे ऑनलाइन व्यासपीठ असलेल्या नेटमेड्सची मालकी ६२० कोटी रुपयांच्या मोबदल्यात मिळविली आहे. मंगळवारी रात्री उशिरा या व्यवहाराची कंपनीकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आली.

देशभरात ६७० शहरांमध्ये विस्तार आणि डॉक्टरांच्या निर्देशपत्रांसह ७० हजारांहून अधिक औषधे तसेच निर्देशपत्राची आवश्यकता नसलेल्या आणखी हजारो वस्तू व जीवनशैली उत्पादने यांच्या विक्रीचे जाळे नेटमेड्सने विणले आहे. ६२० कोटी रुपयांच्या मोबदल्यात रिलायन्सला व्हायटॅलिक हेल्थ या कंपनीत ६० टक्के भागभांडवली मालकी, तर अन्य तीन उपकंपन्यांमध्ये १०० टक्के भांडवली मालकी मिळाली आहे. व्हायटॅलिकसह तीन उपकंपन्यांचे मिळून नेटमेड्स हे ई-फार्मसी व्यासपीठ आकाराला आले आहे.

तीन वर्षांत २३,३०० कोटींचे व्यवहार

रिलायन्स इंडस्ट्रीजने तिचे उद्योग साम्राज्य विस्तारताना गत तीन वर्षांत अनेक प्रस्थापित कंपन्या ताब्यात घेणारे एकूण २३,३०० कोटी रुपयांचे व्यवहार केले आहेत. यापैकी १३ टक्के विक्री/किराणा क्षेत्रातील, ८० टक्के दूरसंचार, माध्यम आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आणि सहा टक्के ऊर्जा क्षेत्रातील ताबा व्यवहारांवर खर्च केले गेले आहेत.