देशभरातील ३२ हजारांहून अधिक रुग्णालयांचे ‘रोहिणी’ छत्र
देशात पहिल्यांदाच रुग्णालयांना अनोखे ओळख क्रमांक (युनिक आयडी) बहाल करून त्यांच्या नोंदणीची पद्धत अस्तित्वात आणली गेली आहे. आरोग्य विमा क्षेत्राचा व्याप विस्तारण्यास मदतकारक ‘रोहिणी’ (रजिस्ट्री ऑफ हॉस्पिटल्स इन नेटवर्क ऑफ इन्शुरन्स) अशा या क्षेत्रातील सर्वच घटकांसाठी फायदेशीर नोंदणी पद्धतीचे अनावरण भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरण (आयआरडीएआय)चे अध्यक्ष टी एस विजयन यांनी सोमवारी मुंबईत केले. यातून आरोग्य विमा सेवेत सामील रुग्णालयांची सूची ऑनलाइन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. देशातील आरोग्य विमा पॉलिसीधारक, रुग्णालये, विमा उद्योग, सरकार, नियामक आणि सर्वसाधारण जनता यांच्यासाठी ते खूपच उपयोगी ठरणार आहे. आयआरडीएआय प्रवर्तक असलेल्या ‘इन्शुरन्स इन्फम्रेशन ब्युरो ऑफ इंडिया’ने हे संकेतस्थळ दाखल केले आहे.
भारतातील आरोग्यनिगा उद्योग हा तब्बल २०,००० कोटी रुपयांचा (ज्यात सरकारी योजनाही आल्या) आहे. पण तरीही आरोग्य विमा उद्योगाशी संबंधित घटकांसाठी रुग्णालयांची कोणतीही विश्वासार्ह नोंदणी पद्धती नव्हती. ‘रोहिणी’ हा रुग्णालयांच्या बाबतीतील माहिती देणारा एक अत्यंत विश्वासार्ह असा स्रोत असेल. तो आरोग्य विमा पुरवठा नेटवर्कमधील संबंधित घटकांची कार्यक्षमता वाढविण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी पार पाडेल, असे या प्रसंगी बोलताना ‘इन्शुरन्स इन्फम्रेशन ब्युरो ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आर राघवन यांनी सांगितले.
आरोग्य विमा सेवा जाळ्यातील सर्व रुग्णालयांची नोंद करण्याची मोहीम हाती आपण घेतली असून, त्या परिणामी ३२ हजारांहूनही अधिक महत्त्वाच्या रुग्णालयांची नोंद झाली आहे. ‘रोहिणी’च्या शुभारंभानंतर अधिकाधिक रुग्णालये यांत सहभागी होऊन हा आकडा वाढतच जाईल, असा विश्वास राघवन यांनी व्यक्त केला.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालय आणि भारतीय उद्योग प्रवर्तक असलेल्या आणि जागतिक मापकांच्या रचना आणि अंमलबजावणीसाठी समíपत असलेल्या ‘जीएस१ इंडिया’च्या मदतीने रुग्णालयांना आता १३ अंकी ‘वैश्विक अनोखा क्रमांक- ग्लोबली युनिक आयडी (जीएलएन)’ तसेच रुग्णालयांच्या पत्त्यांच्या आधारे ‘जिओ कोडिंग’ प्रदान करण्यात आले आहे.
पॉलिसीधारकांना उपचाराप्रसंगी त्यांच्या विमा कंपनीने जी रुग्णालये यादीवर घेतली आहेत त्यातून निवड करणे शक्य होते. त्या रुग्णालयांची वैशिष्टय़े, उपचार सुविधा, त्यांचे स्थळ आदी माहिती त्यांना सत्वर व ऑनलाइन उपलब्ध असेल. ही नोंदणी पद्धत वैद्यक विमा क्षेत्रातील गळती, अपव्यय व नाहक खर्चाला कात्री घालेल, जेणे करून हप्त्यांची पातळी आणखी खाली आणू शकेल. विमा कंपन्यांना दाव्यांच्या (क्लेम्स) पूर्ततेच्या दृष्टीने ही पद्धत सुलभ व गतिमानता आणणारी ठरेल. भविष्यात ही नोंदणी पद्धत परदेशांमधील रुग्णांना आरोग्यसेवेबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध करून देत वैद्यकीय पर्यटनासही चालना देणारी ठरेल, असे या पद्धतीचे सामाजिक व आर्थिक फायदे सांगण्यात आले आहेत