न्यायालयाचा बीएस-४ निर्णय कंपन्यांच्या पथ्यावर; मारुती, टाटा, होंडा, टोयोटाची दुहेरी अंक विक्री वृद्धी

नव्या आर्थिक वर्षांची दमदार सुरुवात देशातील अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी केली आहे. एप्रिलमध्ये दुहेरी अंकातील वाहन विक्री वाढ राखताना टाटा, टोयोटासारख्या कंपन्यांनी आश्चर्यकारक कामगिरी बजाविली आहे.

वाहन विक्रीत देशातील अव्वल मारुती सुझुकीने २३.४० टक्के वाढ नोंदविताना प्रथमच १,४४,४९२ वाहन विक्रीचा टप्पा गाठला आहे. यापूर्वी मारुतीने सर्वोत्तम १,३७,२७७ वाहन विक्री सप्टेंबर २०१६ मध्ये नोंदविली आहे. कॉम्पॅक तसेच बहुपयोगी वाहनांच्या जोरावर मारुतीला यंदा हे यश गाठता आले आहे.

टाटा मोटर्सने यंदा २३ टक्के वाढ राखताना एप्रिलमध्ये १२,८२७ प्रवासी वाहने विकली आहेत. टाटाच्या नव्या टिआगो, हेक्झा या वाहनांना खरेदीदारांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे टाटा मोटर्सला अनेक महिन्यानंतर यंदा वाहन विक्रीतील वाढ नोंदविता आली आहे.

तर होंडाच्या वाहन विक्रीत गेल्या महिन्यात ३८.१ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने एप्रिलमध्ये १४,४८० वाहने विकली होती. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपन्यांच्या १०,४८६ वाहनांची विक्री झाली होती. होंडाने गेल्या महिन्यात तिची नवी होंडा सिटी व डब्ल्यूआर-व्ही हे बहुपयोगी गटातील नवे वाहन बाजारपेठेत उतरविले होते.

जपानच्याच टोयोटाला यंदा तब्बल ५१.८१ टक्के झेप घेता आली आहे. कंपनीने एप्रिल २०१६ मधील ८,५२९ वाहनांच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमध्ये १२,९४८ वाहनांची विक्री केली आहे. कंपनीने गेल्याच महिन्यात तिची स्पोर्ट यूटिलिटी श्रेणीतील नवी फॉच्र्युनर सादर केली होती.

तुलनेत देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ह्य़ुंदाई मोटर इंडियाला केवळ ५.६८ टक्के वाढीवर समाधान मानावे लागले आहे. कंपनीची देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री अवघी ४४,७५८ झाली आहे.

वाहन निर्यात विक्रमी टप्प्यावर

देशातील प्रवासी वाहनांची निर्यात गेल्या आर्थिक वर्षांत विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. २०१६-१७ या वित्त वर्षांत भारतातील वाहन कंपन्यांच्या प्रवासी गटातील वाहनांची निर्यात १६.२ टक्क्य़ांनी विस्तारत ७,५८,८३० झाली आहे. मात्र दुचाकी निर्यात मात्र ५.७८ टक्क्य़ांनी घसरून २३,३९,२७३ झाली आहे. आधीच्या वित्त वर्षांतील निर्यात ६,५३,०५३ वाहने होती.

‘शुद्ध हवेसाठी सामुहिक प्रयत्न हवेत’

वाहनांद्वारे होणारे वाढते प्रदुषण डोळेझाक करण्यासारखे नसून शुद्ध हवेसाठी सामुहिक प्रयत्न व्हायला हवेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. शुद्ध हवेसाठी खरी जबाबदारी वाहन कंपन्यांची असून त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यायला हवा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. बीएस-४ बाबत सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयाचा तपशील सोमवारी जाहीर झाला. त्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे.