निकोप स्पर्धेला मारक ठरणाऱ्या ‘गूगल’च्या धोरणांबाबत सुस्पष्ट नाराजी दर्शवत, तक्रारवजा सूर विविध १५ नवउद्यमी उपक्रमांच्या संस्थापकांनी शनिवारी भारतीय स्पर्धा आयोगाबरोबर (सीसीआय) झालेल्या आभासी बैठकीत मांडला. बैठकीत सहभागी दोन संस्थापकांनीच याचा खुलासा केला.

गूगलने अलीकडेच भारतीय उपयोजन (अ‍ॅप) विकासकांवर प्ले स्टोअर देयक प्रणाली लागू केली. शिवाय गूगलच्या प्रणालीद्वारे डिजिटल वस्तू व सेवांची विक्री करण्यासाठी ३० टक्के शुल्क आकारणीच्या पद्धतीविरुद्धही नवउद्यमींची नाराजी दिसून येते.

मोबाइल फोनची कार्यप्रणाली (ओएस) जर गूगल अँड्रॉइडवर बेतलेली असेल तर अशा फोनमध्ये गूगल प्ले स्टोअर हे वितरण व्यासपीठ अंगभूत (प्री-लोडेड) उपलब्ध असते. हे गूगलला प्रतिस्पध्र्याच्या तुलनेत अंतर्निहित फायदा देण्यासह, तिची मक्तेदारी स्थापित करण्यासही हातभार लावणारे असल्याचे नवउद्यमी आणि उपयोजन विकासकांचे म्हणणे आहे.

मोबाईल उपयोजन अर्थात अ‍ॅपचा शोध आणि वितरणामुळे, वर्चस्वामुळे, गूगल भारतीय विकासकांना त्यांच्या कार्यप्रणाली (ओएस) आणि अ‍ॅप स्टोअरवर आधारित अ‍ॅप्स तयार करण्यास आणि बदलण्यास भाग पाडत आहे, असा विकासकांचा आरोप आहे. गूगलच्या ‘मनमानी’ धोरणाचे हेच ठळक उदाहरण म्हणून त्यांनी स्पर्धा आयोगापुढे  ठेवले आहे.