देशाने आठ टक्क्यांचा वृद्धिदर गाठायचा झाल्यास, पायाभूत क्षेत्राचा विकास आवश्यक ठरेल आणि त्याला पूरक अशा ‘इन्फ्रास्ट्रक्चर डेट फंड (आयडीएफ)’सारख्या नव्या धाटणीच्या वित्तीय उत्पादनांचीही गरज असल्याचे अर्थमंत्री पी. चिदम्बरम मंगळवारी येथे बोलताना प्रतिपादन केले.
पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी पूरक आर्थिक तजवीज करणाऱ्या १ अब्ज अमेरिकी डॉलरच्या आयआयएफसीएल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीद्वारे प्रस्तुत इन्फ्रास्ट्रक्चर डेट फंड-आयडीएफची प्रस्तुती चिदम्बरम यांच्या हस्ते झाली. याप्रसंगी या फंडात गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या तीन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि आयआयएफसीएल आणि हडको या दोन वित्तीय संस्थांबरोबर सामंजस्यांचा करारही अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. २०१० सालच्या अर्थसंकल्पात घोषणा झालेल्या ‘आयडीएफ’विषयक नियमन आणि मार्गदर्शक तत्त्वांची सेबी आणि रिझव्‍‌र्ह बँकेकडून गेल्या वर्षी घोषणा करण्यात आली आणि त्या अनुषंगाने दाखल झालेला हा पहिला फंड आहे. या फंडाचे १ अब्ज डॉलरचे गंगाजळीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी देशातील तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनाही आकर्षित केले जाणार आहे. देशातील रोखे बाजारपेठेच्या सशक्त विकासाच्या दृष्टीने हा फंड पर्याय मोलाची कामगिरी बजावेल, असा विश्वास याप्रसंगी बोलताना आयआयएफसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. के. गोयल यांनी व्यक्त केला.