बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित नैसर्गिक वायू दरवाढीचा निर्णय पुढील महिनाअखेर घेतला जाईल, असे केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दरवाढीबाबत समितीने केलेल्या शिफारसीवर ३० सप्टेंबरनंतर भूमिका जाहीर केली जाईल, असे केंद्रीय तेलमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी बुधवारी राज्यसभेत ही बाब स्पष्ट केली.
एका प्रश्नाच्या उत्तरात प्रधान यांनी याबाबत नवी कोणतीही समिती नेमण्यात येणार नसल्याचेही सांगितले. इंधन दरवाढीबाबतचा निर्णय गुंतवणूकदार आणि ग्राहक यांना समोर ठेवूनच घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीत नियुक्त करण्यात आलेल्या सी. रंगराजन समितीने वायूच्या किमती ४.२ प्रति दशलक्ष औष्णिक घटकावरून दुप्पट करण्याची शिफारस केली होती. त्याची अंमलबजावणी एप्रिलपासून करण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे तो लांबणीवर पडला. यानंतर सत्तेवर आलेल्या भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकारने अभ्यासासाठी हा निर्णय ३० सप्टेंबपर्यंत थोपवून ठेवण्याचे धोरण अंगीकारले. त्यामुळे सध्या जुन्याच दराने वायू विक्री होत आहे.