महागाईबाबत रघुराम राजन यांना विश्वास; सरकारच्या पतधोरण समितीलाही संमती

निवृत्तीपूर्वीच मुदतवाढीच्या चर्चेत राहिलेले रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सोमवारी सरकार नियुक्त करणार असणाऱ्या नव्या पतधोरण समितीचे स्वागत करताना आपला उत्तराधिकारीच वाढत्या महागाईचा सामना करेल, असे स्पष्ट केले.
४ सप्टेंबर रोजी गव्हर्नरपदाची मुदत संपत असताना सरकारमधून राजन यांना अपेक्षित मुदतवाढ मिळण्याच्या तमाम अर्थतज्ज्ञांच्या आशेला सुरुंग लागला होता.

रिझव्‍‌र्ह बँक कर्मचाऱ्यांना शनिवारी उद्देशून लिहिलेल्या पत्रात आपल्याला मुदतीनंतर गव्हर्नर म्हणून राहण्याची इच्छा नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अवघ्या एकाच दिवसात राजन यांनी सरकारच्या पतधोरण समितीबाबत भाष्य करत ही समिती तसेच तिचा प्रमुख या नात्याने नवा गव्हर्नर महागाईचा योग्य सामना करेल, असा विश्वास सोमवारी व्यक्त केला.

‘टाटा इन्स्टिटय़ुट ऑफ फंडामेंटल रिसर्च’तर्फे आयोजित ‘फाईट अगेन्स्ट इन्फ्लेशन’ या विषयावर डॉ. राजन यांनी मुंबईत आपले मत मांडले.
या समितीचा आराखडा आणि एकूणच ही समिती लवकरच आकार घेऊन भविष्यातील कमी महागाईची स्थिती निर्माण करेल, असा विश्वासही राजन यांनी यावेळी केलेल्या भाषणात व्यक्त केला.

महागाई, व्याजदर निश्चिती आदी रिझव्‍‌र्ह बँकेची विद्यमान प्रमुख कर्तव्ये पार पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या समितीचे गठण केले आहे. अर्थातच रिझव्‍‌र्ह बँकेच्या अखत्यारितील ही समिती असली तरी गव्हर्नर म्हणून यापूर्वी स्वतंत्र घेतलेले निर्णय यानंतर समितीवर अवलंबून असतील.