‘व्हीई कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेड’चा भाग असलेल्या ‘आयशर ट्रक्स अँड बसेस’ने बीएसआयव्ही तंत्रज्ञानयुक्त व १६ टन ते ४० टन क्षमतेच्या अवजड वाहन – ट्रकची ‘आयशर प्रो ५००० सीरिज’ ही नवी मालिका नुकतीच सादर केली. स्पर्धात्मक किंमतीत उपलब्ध झालेल्या या प्रगत तंत्रज्ञानयुक्त ट्रक्सच्या श्रेणीच्या माध्यमातून अवजड वाहन गटातील आपले स्थान अधिक भक्कम बनवण्याचे कंपनीचे नियोजन असून व्यापारी वाहतुकीच्या आधुनिकीकरणाला चालना देण्याच्या ध्येयधोरणालाही बळकटी येईल, असे स्पष्ट केले आहे.

‘आयशर प्रो ५००० सीरिज’ ही उच्च टिकाऊ बीएसआयव्ही ट्रक्सची नवी श्रेणी असून ‘व्होल्व्हो ग्रुप’च्या ईएमएस ३.० प्रणालीसह आय३ ईजीआर तंत्रज्ञानयुक्त उच्च कार्यक्षम ई६९४ इंजिनासह अजोड विश्वसनीयता मिळवून देण्याच्या हेतूने या तिची रचना व विकास करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नवी वाहने सादर करताना ‘व्हीई कमर्शियल व्हेईकल्स’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद अगरवाल यांनी सांगितले की, की ‘प्रो 5000 सीरिज’ ही मालिका सादर केल्याने ‘आयशर’कडे आज विविध किंमतश्रेणीतील अवजड वाहनांची (एचडी) विशाल श्रेणी उपलब्ध झाली आहे. नव्या बीएसआयव्ही तंत्रज्ञानाची इंजिने असलेले हे वाहन आय३—ईजीआर या अभिनव, समकालीन आणि कार्यक्षम तंत्रज्ञानावर आधारित आहेत. या नव्या ई ६९४ इंजिनामध्येही ‘व्होल्व्हो ग्रुप’च्या ईएमएस ३.० या इंजिन मॅनेजमेंट सिस्टिमवर आधारित प्रगत वैशिष्टय़े समाविष्ट आहेत.

‘व्होल्व्हो ग्रुप’च्या ईएमएस ३.० प्रणालीचा अंतर्भाव आयशर प्रो ५००० सीरिज वाहनंमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये ट्रक्स, ट्रॅक्टर्स व टिपर्सची १६ टन ते ४० टन जीव्हीडब्ल्यू क्षमतेतील बीएसआयव्ही तंत्रज्ञानासहितची श्रेणी उपलब्ध करण्यात आली आहे.