शेअर बाजारात न्यू इंडिया ऍश्‍युरन्स कंपनीचे शेअर खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. या शेअरची सुरुवातीची किंमत ८०० रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र मागणीअभावी कमकुवत सुरुवातीमुळे या शेअरमध्ये ६ टक्क्यांची घट झाली. त्यामुळे शेअरची किंमत साधारणत: ६० रुपयांनी घसरली. सध्या हा शेअर खरेदी करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतो आहे. याशिवाय किरकोळ गुंतवणूकदार आणि पात्र कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने एका शेअरवर ३० रुपयांची सवलत दिली होती. त्यामुळे ८०० रुपयांचा शेअर ७७० रुपयांना उपलब्ध झाला आहे.

न्यू इंडिया ऍश्योरन्स कंपनीच्या शेअरची किंमत ८०० रुपये ठेवण्यात आली होती. मात्र शेअर बाजारातील उलाढालींना सुरुवात होताच कंपनीच्या शेअर्सची किंमत घसरली. कंपनीच्या शेअरला सुरुवातीला ७४८.९० रुपये इतका दर मिळाला. यानंतरही त्यामध्ये सातत्याने घसरण होताना दिसली. कंपनीचा शेअर पहिल्या तासाभरात ७१७.४० रुपयांपर्यंत खाली होता. मात्र त्यानंतर शेअरची किंमत वधारली. मात्र तरीही शेअरचा दर ७५० रुपयांच्या वर गेलेला नाही.

न्यू इंडिया ऍश्‍युरन्स कंपनीचा आयपीओ १ ते ३ नोव्हेंबरदरम्यान बाजारात उपलब्ध झाला. यानंतर आज ऑफर फॉर सेल आणि फ्रेश इश्‍यू या पद्धतीने कंपनीच्या शेअर्सची विक्री होत असून, त्याद्वारे ९,६०० कोटी रुपये (८०० रुपये प्रति शेअर गृहीत धरता) उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. कमीत कमी १८ शेअर व त्या पटीत जास्तीत जास्त २३४ शेअर खरेदी करण्याची मुभा किरकोळ गुंतवणूकदारांना देण्यात आली आहे. किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचारी यांना प्रतिशेअरमागे ३० रुपयांची सवलत देण्यात आली आहे.