अ‍ॅटलस कॉपको कंपनीने पुणे परिसरातील व्यवसायाचा विस्तार करीत चाकण येथे नवा कॉम्प्रेसर उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे. २३ एकरच्या विस्तीर्ण जागेमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला असून, त्या ठिकाणी औद्योगिक व पोर्टेबल कॉम्प्रेसरची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पात सुमारे शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. चाकणच्या प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी क्वालिटी एअर डिव्हिजनचे अध्यक्ष हॉर्स्ट वासेल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. अ‍ॅटलस कॉपकोचे व्यवस्थापकीय संचालक फिलिप वांदेनबर्घ, उपाध्यक्ष- कॉम्प्रेसर टेक्निक ऑपरेशन रुडी वेस्स्ट्रेपेन हेही त्या वेळी उपस्थित होते.
तेवीस एकर जागेत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात १९ हजार चौरस मीटरचे बांधकाम असून, त्यात कार्यालयाची इमारत, अद्ययावत कॅन्टीन व कर्मचाऱ्यांसाठी इतर सुविधांचाही समावेश आहे. हा प्रकल्प एलईईडी तत्त्वानुसार बांधण्यात आला आहे. या प्रकल्पातील उत्पादनाबरोबरच दापोडी येथील सध्याच्या उत्पादन व्यवस्थेत ऑईल फ्री कॉम्प्रेसर व एअर उत्पादनांची निर्मिती कायम ठेवण्यात येणार आहे. कंपनीच्या व्यवसायाबाबत हॉस्ट वासेल म्हणाले की, या समूहाने भारतावरील आपले लक्ष कायम ठेवले आहे. नव्या प्रकल्पामुळे कार्यक्षमता वाढण्याबरोबरच भारतातील व्यवसायाचा विस्तार होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे भारत व परदेशातील ग्राहकांची सेवाही कायम राहू शकेल.