विक्रीतून होणाऱ्या कमी लाभापायी विकासकांनी नव्या स्थावर मालमत्ता प्रकल्पांची उभारणी निम्म्यावर आणली आहे. वर्षभरापूर्वीच्या ५५,५०० मालमत्तांच्या तुलनेत जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान नवीन केवळ २४,७०० निवारेच साकारले आहेत.
देशातील स्थावर मालमत्ता क्षेत्राचा गेल्या तिमाहीचा आढावा घेताना स्थावर मालमत्ता सल्लागार संस्था ‘कुशमॅन अ‍ॅण्ड वेकफिल्ड’ने (सी अ‍ॅण्ड डब्ल्यू) ही बाब आपल्या ताज्या अहवालातून समोर आणली आहे. कमी प्रकल्पांमागे विकासकांना होणाऱ्या अल्प परताव्याचे निमित्त देण्यात आले आहे.
जानेवारी-मार्च २०१४ मध्ये नवे ५५,५०० स्थावर मालमत्ता प्रकल्प साकारले गेले होते. यंदाच्या वर्षांत, याच कालावधीत ते अवघे २४,७०० झाले आहेत. वार्षिक तुलनेत ही घसरण तब्बल ५० टक्क्यांची आहे. प्रामुख्याने निवासी क्षेत्रातील संकुलाच्या अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या विक्रीमुळे विकासकांनी नव्या प्रकल्पांमध्ये अधिक हात घातला नाही, असे संस्थेच्या निवासी व्यवहार सेवेच्या कार्यकारी संचालक श्वेता जैन यांनी म्हटले आहे. नव्या प्रकल्पांच्या उभारणीसाठीचा खर्च सातत्याने वाढत असून सरकार दफ्तरी रेंगाळणाऱ्या विविध परवानगीपोटी तो अधिक वृद्धिंगत झाल्याचे मतही जैन यांनी व्यक्त केले. वाढत्या कर्जाचा भार वाहणाऱ्या विकासकांनी या कालावधीत कर्ज पुनर्बाधणीसह, स्वस्त कर्ज तसेच खासगी भांडवल मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचेही त्या म्हणाल्या. नव्या प्रकल्पांमध्ये केवळ अतिमहागडय़ा घरांमध्ये लक्षणीय, २६ टक्के वाढ नोंदली गेल्याचेही हा अहवाल सांगतो. तर माफक दरातील घरांच्या उभारणीत ८० टक्के घसरण झाली आहे.