मुंबई : एरंडेल शेतीमध्ये एक मोठी संधी निर्माण झाली असून तंत्रज्ञान आणि बियाणाच्या दर्जात थोडासा बदल केल्यास उत्पादकता १०० टक्क्यांनी वाढविता येणार आहे.

गुजरातमधील बनासकांठा, पाटण, साबरकांठा, आरवली, जुनागढ आणि कच्छ या सहा जिल्ह्य़ांतील आदर्श एरंडेल शिवारांमध्ये पारंपरिक शेती पद्धतीत किंचित बदलाने मिळविलेल्या उत्पादनाच्या अभ्यासाअंती हा दावा सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) या देशातील तेलबिया प्रक्रियादार संघटनेने केला आहे. या अभ्यासाच्या निष्कर्षांची माहिती संघटनेचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी बुधवारी दिली.

आदर्श एरंडेल शिवार प्रकल्पामध्ये एरंडेल बियांची उत्पादकता ८० ते १०० टक्क्यांनी वाढल्याचे सिद्ध झाले आहे. सरदार कृषीनगर दंतेवाडा कृषी विद्यापीठाचे जीसीएच-७ हे पिकाची उत्तम वाढ, रोग प्रतिबंधकता आणि उत्पादकता या आघाडय़ांवर अत्यंत चांगले वाण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वाणासह सेंद्रिय पीक पद्धती, पिकांमधील अंतर, पाणी देण्याचे तंत्र, आंतर पिके घेणे, वारा आणि सूर्य प्रकाशाचा वापर यासारख्या आदर्श शेती पद्धतीच्या वापरामुळे पिकाची उत्पादकता एकरी सरासरी २०६६ किलोवरून ३५०० ते ६००० किलोग्रॅम उत्पादन घेता आले आहे.

या प्रकल्पांतर्गत तांत्रिक मार्गदर्शन आणि माहिती एसईएकडून मोफत पुरविली गेली असून, असे विविध राज्यांत असे आदर्श शिवार उभारण्याचा तिचा संकल्प असल्याचे चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले. एरंडेल पीक घेणाऱ्या अन्य विभागांत हा उपक्रम राबवल्यास, एरंडेल तेल व अन्य उप उत्पादनांची सध्या असलेली ८,००० कोटी रुपयांची निर्यात लक्षणीयरीत्या निर्यात वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल, असा विश्वास कॅस्टर सीड अ‍ॅण्ड ऑइल प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष अभय उदेशी यांनी व्यक्त केला.