दुचाकी आणि तिचाकी निर्माता टीव्हीएस मोटर कंपनीने सोमवारी ११० सीसी इंजिन क्षमतेची नवीन स्टार सिटी ही मोटरसायकल सोमवारी चेन्नई येथे दाखल केल्या. कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवास यांनी ही नवी बाइक इंधन कार्यक्षम दुचाकी बाजारक्षेत्रात कंपनीचे कोणतेही उत्पादन नसण्याची उणीव भरून काढेल, असा विश्वास व्यक्त केला. चालू वर्षांत दर तिमाहीला नवीन उत्पादन कंपनी बाजारात आणेल, असे आपले धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढच्या महिन्यात ‘स्कूटी झेस्ट’ बाजारात येईल, त्यानंतरच्या तिमाहीत व्हिक्टर, त्यापुढे नवीन स्टार सिटी+ या मोटरसायकल्स तर २०१५ आर्थिक वर्षांच्या अंतिम तिमाहीत ‘अपाचे’ची नवीन अद्ययावत आवृत्ती बाजारात येणार असल्याचे नियोजन त्यांनी स्पष्ट केले. टीव्हीएसच्या ताफ्यात सध्या १२५ सीसी व अधिक क्षमतेच्या फिनिक्स आणि अपाचे आरटीआर मालिकेतील बाइक बाजारात उपलब्ध आहेत. आगामी सहा महिन्यांत ६०,००० नवीन स्टार सिटी बाइक्स विकल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच्या घडीला टीव्हीएसच्या जुन्या रूपातील स्टार सिटीचे ४५ लाख ग्राहक असल्याचे त्यांनी सांगितले.

सुझुकी मोटरसायकलचे  पाच लाखांच्या विक्रीचे लक्ष्य
जपानची दुचाकी अग्रणी सुझुकी मोटरसायकलने विद्यमान २०१४ आर्थिक वर्षांत भारतात पाच लाख मोटरसायकल्सच्या विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे. सुझुकीचेही सध्या पोकळी असलेल्या ११० सीसी क्षमतेच्या बाजारवर्गात ‘लेट्स’ या नावाने स्कुटरेटीसह आणखी एक दुचाकी बाजारात आणण्याचे नियोजन आहे. सध्याच्या घडीला देशस्तरावर विक्रीच्या प्रमाणात सुझुकी तिसऱ्या स्थानावर, कंपनीने सरलेल्या २०१३-१४ सालात ३.७० लाख दुचाकींची विक्री केली आहे.