जागतिक लोकसंख्येत १७.५ टक्के हिस्सा असलेल्या भारताकडे जागतिक भूक्षेत्राचा केवळ २.४ टक्के हिस्सा आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनायचे झाल्यास मोठय़ा प्रमाणात शहरीकरण हे क्रमप्राप्तच ठरेल आणि हे शहरीकरणदेखील उपलब्ध अपुऱ्या भूभागावरच होणार असल्याने, आगामी काळात शहरे ही अनेक क्लिष्ट पर्यावरणीय व नागरी समस्यांचे आगार बनल्यास नवल ठरू नये. याच पाश्र्वभूमीवर शाश्वत विकासाची हमी देणाऱ्या नागरीकरणावर हरित बांधकामप्रणालींमार्फत भर देणाऱ्या भारतातील पहिल्यावहिल्या ‘इकोबिल्ड इंडिया’ या प्रदर्शन व परिषदेचे आयोजन मुंबईत झाले आहे.
जगभरातील शाश्वत विकासाची कास धरणारे १०० हून अधिक तज्ज्ञांचे देशभरातून आलेल्या हजारो वास्तुरचना आणि बांधकाम उद्योगातील व्यावसायिकांबरोबर विचारमंथनाचे व्यासपीठ असण्याबरोबरच, ‘इकोबिल्ड इंडिया’ हे किफायती, पर्यावरणाला किमान हानी पोहचविणाऱ्या नावीन्यपूर्ण बांधकाम उत्पादने आणि सेवाप्रणालींचे हे सर्वात मोठे प्रदर्शनही आहे. गोरेगाव (पूर्व) येथील मुंबई प्रदर्शन संकुलात मंगळवार, १६ एप्रिलला सुरू झालेले हे प्रदर्शन गुरुवार १८ एप्रिलपर्यंत सर्वासाठी खुले राहील.
एका ताज्या सर्वेक्षणानुसार सध्या भारतातील नागरीकरणाचा वेग लक्षात घेतल्यास दरसाल किमान ७०० दशलक्ष आणि ९०० दशलक्ष चौरस मीटर इतके निवासी आणि वाणिज्य बांधकाम उभे करावे लागेल. म्हणजे २०३० साली स्थावर मालमत्ता क्षेत्रात जो विकास व्हायचा आहे, त्यापैकी जवळपास ७० टक्के होणे अद्याप बाकी आहे. आगामी पिढीला हरित भविष्यकाळ द्यावयाचा झाल्यास प्रचंड वेगाने होणारे हे नवीन बांधकाम हे शाश्वत विकासाची कास धरूनच केले जाण्याशिवाय पर्याय नाही, असे उद्गार प्रख्यात वास्तुविशारद करण ग्रोवर यांनी इकोबिल्डच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना काढले.
यूबीएम इंडियाद्वारे आयोजित या प्रदर्शनात, आगामी काळात हरित बांधकामाच्या अध्वर्यू असलेल्या अ‍ॅशटेक इंडिया, पिडिलाइट इंडस्ट्रीज, फॉबरे फ्लोअरिंग, एसटीपी इंडस्ट्रीज, बैजनाथ, ग्रीन बिल्ड प्रॉडक्ट्स, टेक्सप्लास कम्पोझिट्स, गायप्लॉक वगैरेसारख्या अनेक कंपन्या त्यांची नावीन्यपूर्ण उत्पादने घेऊन सामील झाल्या आहेत.