चंदा कोचर यांचे बँकप्रमुखांना आवाहन

बँकिंग उद्योगात काही उलथापालथ घडायची असेल तर ती या क्षेत्रात नवनवीन स्पर्धकांच्या येण्याने नव्हे तर नव्याने येत असलेल्या तंत्रज्ञान व त्याच्या वापरातून घडून येईल. त्यामुळे नव्याने येऊ घातलेल्या पेमेंट बँकांबाबत बागुलबुवा व भ्रमिष्टावस्था प्रस्थापित बँकांच्या प्रमुखांनी ताबडतोबीने झुगारून द्यावी, असे आवाहन आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांनी येथे केले.
आज या नवागत बँकांबाबत दिसणाऱ्या भीती व चिंतेचे वातावरण हे अनाठायी असल्याचे सांगत, ही स्थिती घातक वळणाकडे घेऊन जाणारी ठरेल, असा इशाराही त्यांनी भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयद्वारे आयोजित एका परिसंवादात बोलताना दिला. तंत्रज्ञानाचा अवलंब करून बँकांना नव्या संधींना गाठता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वस्तुत: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडून पेमेंट बँक म्हणून कार्य करण्यास तत्त्वत: मंजुरी मिळविलेल्या ११ नव्या बँकांबाबत शंकास्पद सूर आळवला आहे. या बँकांना ठेवीही गोळा करता येणार असल्याने, ते वाणिज्य बँकांच्या तुलनेत व्याजाचे दर स्पर्धात्मक ठेवतील आणि त्यांचे ठेवीदारही पळवतील. या चढाओढीत कर्जाचे व्याजाचे दर खाली आणण्याच्या प्रयत्नांना खीळ बसेल, अशी शंका व्यक्त करणारी भट्टाचार्य यांनी ऑगस्टमध्ये प्रतिक्रिया दिली होती. चंदा कोचर यांनी त्यावर शरसंधान करतानाच वरील विधान केले.