मावळत्या २०७६ संवत्सरात दोन अंकी परताव्यासह, नवीन उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी, २०७७ या नव्या संवत्सराचे स्वागत अनुक्रमे ४३,८३० आणि १२,८१५ अशा ऐतिहासिक शिखर पातळ्या गाठून केले.

भांडवली बाजारासाठी शनिवार हा सुट्टीचा दिवस होता, परंतु सायंकाळी ६.१५ वाजल्यापासून मुहूर्ताचे विशेष व्यवहार झाले. सणोत्सवाचे वातावरण असताना, निर्देशांकांनी गाठलेली नवी उंची उत्साह वाढवणारी होती. मुहूर्ताचे विशेष व्यवहार संपले तेव्हा सेन्सेक्स शुक्रवारच्या तुलनेत १९४.९८ अंशांची भर घालून ४३,६३७.९८ या पातळीवर विसावला. निफ्टी निर्देशांकही ६०.३० अंशांच्या कमाईसह १२,७८०.३० पातळीपर्यंत पोहोचला.  बाजारात निर्देशांकांनी करोनापूर्व पातळी यापूर्वीच गाठली असून, आता अर्थव्यवस्थाही वेगाने फेरउभारी घेत विकासपथावर येईल, या आशावादाने गेल्या काही सप्ताहांपासून सेन्सेक्स-निफ्टीची दणक्यात घोडदौड सुरू आहे. मुहूर्ताच्या व्यवहारात एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड, इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स अशा आघाडीच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदी केली. भारत पेट्रोलियमच्या समभागाने पाच टक्क्यांनी उसळी घेतली. सामान्य गुंतवणूकदारांच्या पसंतीच्या स्मॉल आणि मिड कॅप समभागांतही चांगली खरेदी झाल्यामुळे या निर्देशांकांनीही अनुक्रमे ०.६२ टक्के आणि ०.८४ टक्के अशी मुख्य निर्देशांकांपेक्षा सरस वाढ या विशेष व्यवहारांत नोंदवली.

अर्थव्यवस्था फेरउभारीकडे..

समभाग बाजारात निर्देशांकांनी करोनापूर्व पातळी यापूर्वीच गाठली आहे. आता अर्थव्यवस्थाही वेगाने फेरउभारी घेत विकासपथावर येईल, असा आशावाद आहे. त्यामुळेच काही सप्ताहांपासून सेन्सेक्स-निफ्टीची दणक्यात घोडदौड सुरू आहे.