भारतातील आर्थिक सुधारणांसाठी येती दोन-तीन वर्षे महत्त्त्वाची आहेत, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. आर्थिक वाढीच्या ७ ते ७.५ टक्के दराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकार आर्थिक सुधारणा करीत असून त्यासाठी अनेक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
भारतीय लोक, सरकार व उद्योजक यांच्यात ७ ते ७.५ टक्के आर्थिक वाढ दराबाबत मोठी उत्सुकता नाही कारण प्रत्येकाला हे माहिती आहे, की भारताची क्षमता त्यापेक्षाही जास्त आर्थिक विकास दर गाठण्याची आहे. आपण व पंतप्रधान मोदी यांनाही तसेच वाटते असे जेटली यांनी सांगितले.
वॉरबर्ग पिन्कस गुंतवणूक संस्था व माजी अर्थमंत्री टिमोथी गायथनर यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सांगितले, की एका वर्षांत आमच्या सरकारने मोठे अंतर कापले आहे, आता आर्थिक सुधारणांसाठी पुढील दोन-तीन वर्षे महत्त्वाची आहेत व अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकामागोमाग एक योजना सुरू होत आहेत. आम्ही विकासाची उद्दिष्टे गाठू शकू असा विश्वास आहे.
जेटली हे दहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून त्यांच्या मते स्थूल आर्थिक निदर्शक व सांख्यिकीय आकडे चांगले दिसत असले, तरी लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अर्थव्यवस्थेबाबत भारताची विश्वासार्हता ढासळली होती.
कारण राजकीय प्रशासने व धोरणे चुकीची होती. यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधानांचा शब्द अखेरचा मानला जात नव्हता, कम्युनिस्ट देशांप्रमाणे सरकारबाह्य़ अधिकारी केंद्रे होती, त्यामुळे सगळा कारभारच ठप्प झाला होता, त्या सरकारने उत्पादकता व संपत्तीच्या निर्मितीवर भर न देता अनुदान वाटपांवर भर दिला, त्यामुळे भारताची आर्थिक प्रतिमा खालावली. १९७० पासून भारतात मोठे बदल झाले आहेत, आपली आर्थिक क्षमता इतकी कमी नाही, हे लोकांनाही माहिती आहे, असे त्यांनी सांगितले.