मसाले, तेलबिया आणि इतर खाद्यपदार्थाचे उत्पादन व त्यांच्या निर्यातीतील अग्रेसर कंपनी एनएचसी फूड्स लिमिटेडने आपल्या आगामी विस्तार नियोजनाचा भाग म्हणून येत्या मार्चमध्ये पात्र संस्थागत गुंतवणूकदारांना (क्यूआयपी) प्राधान्याने भागविक्री करून २५ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.
चालू २०१२-१३ आर्थिक वर्षअखेर एनएचसी फूड्स लि.ने उलाढालीत १३० कोटी रुपयांचे लक्ष्य निर्धारीत केले आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अपूर्व शहा यांनी सांगितले. अलीकडेच मुंबई, महाराष्ट्र व गुजरातमध्ये दाखल केलेल्या ‘साझ मसाला’ या ब्रॅण्डला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. स्थानिक बाजारपेठेतील असंघटित मसाला बाजारपेठेतील संधीचा फायदा घेण्याचा कंपनीचा मानस असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. ३१ डिसेंबर २०१२ अखेर नऊमाहीत कंपनीने १०१.८८ कोटींची एकूण उलाढाल नोंदविली असून, गेल्या वर्षीच्या याच नऊमाहीतील ८८.५१ लाख रुपयांचा निव्वळ नफा ५८.५ टक्क्यांनी वाढवून १४०.२९ लाखांवर नेला आहे.