जागतिक बाजारात उत्साह परतल्याचे पाहून गुरुवारी स्थानिक भांडवली बाजारात निर्देशांकांनी पुन्हा वरच्या दिशेने कूच केली. बँका, वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची चमकदार कामगिरी राहिली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने गुरुवारच्या व्यवहारात ३६,८०६.३० असा उच्चांकी स्तर गाठून, दिवसअखेरीला ४०८.६८ अंश कमावून ३६,७३७.६९ या पातळीवर विसावा घेतला. त्याचप्रमाणे अधिक व्यापक प्रतिनिधित्व असलेल्या निफ्टी निर्देशांकाने बुधवारच्या तुलनेत १०७.७० अंशांची भर घालून १०,८१३.४५ पातळीवर दिवसाला निरोप दिला. दोन्ही निर्देशांकाचे गुरुवारचे बंद स्तर हे चार महिन्यांपूर्वी मागे सोडलेल्या उच्चांकाला पुन्हा गाठणारे ठरले आहेत.

वित्तीय सेवा क्षेत्रातील समभागांमध्ये बजाज फायनान्स हा सर्वाधिक ३.९३ टक्क्य़ांची वाढ नोंदविणारा समभाग ठरला. त्या खालोखाल स्टेट बँक, टाटा स्टील, एचडीएफसी, बजाज फिनसव्‍‌र्ह, एचसीएल टेक, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी सेन्सेक्सच्या चार शतकी मुसंडीत मोठे योगदान दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ग्लोबल वीक २०२०’ परिषदेत, विदेशी कंपन्यांना आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारतात गुंतवणुकीसाठी केलेले आवाहन आणि त्या दिशेने गुंतवणूकदार-स्नेही, स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरण निर्मितीतून आकर्षक संधींची दिलेली ग्वाही ही बाजारात गुंतवणूकदारांच्या खरेदी उत्साहास बळ देणारी ठरली.

जागतिक स्तरावर चिनी भांडवली बाजाराच्या नेतृत्वात आशियाई बाजारांतील तेजीपूरक वातावरणाचा आपल्या बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. युरोपीय भांडवली बाजारातील व्यवहारांनाही तेजीसह सुरुवात झाली. गुरुवारी बाजारातील खरेदीचा बहर हा सर्वसमावेशक होता, हे स्मॉल आणि मिड कॅप समभागांमधील मूल्यवृद्धीने दाखवून दिले. या समभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निर्देशांकांनी जवळपास अर्धा टक्क्य़ांची वाढ दिवसाच्या व्यवहारात साधली.

सकारात्मकतेचा प्रभाव..

देशात करोना रुग्णसंख्येत दररोज विक्रमी प्रमाणात नवीन भर पडत असून, एकूण करोनाबाधितांच्या संख्येने पावणेआठ लाखांपर्यंत मजल मारली आहे. तथापि, या चिंताजनक बाबींपेक्षा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने येत असलेल्या सकारात्मक बातम्यांचा सुखावणारा परिणाम मोठा असल्याचे, गुरुवारच्या व्यवहारांसंबंधी जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी केले.