शेअर बाजाराने नववर्षांतील धुमधडाका सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच असून, ताज्या तेजीतून आता गेली अडीच-तीन वर्षे पाठ फिरविलेले गुंतवणूकदारही बाजाराकडे ओढले जातील, असा कयास केला जात आहे.
संभाव्य मंदीच्या खाईतून वाचविणारे ‘फिस्कल क्लिफ’ नावाचे अरिष्ट टाळणारे अमेरिकेत घडून आलेले सामंजस्य हा जगभरच्या भांडवली बाजारांना स्फुरण चढविणारा महत्त्वाचा पैलू असला, तरी महिनाअखेरीस रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणात व्याजदर कपातीच्या बळावलेल्या शक्यतादेखील स्थानिक बाजाराच्या उधाणाचा प्रमुख घटक आहे. शिवाय विदेशी वित्तसंस्थांकडून निरंतर सुरू असलेली गुंतवणूकही प्रमुख निर्देशांकांकडून नवीन उच्चांक गाठण्याबाबत आशा-अपेक्षांना बळ देणारा ठरत आहे.
परिणामी निफ्टी निर्देशांकाने काल महत्त्वाची तांत्रिक पातळी छेदल्यानंतर, आज (बुधवारी) ६००० अंशांचा जादुई टप्पाही गाठला. दोन वर्षांपूर्वी ६ जानेवारी २०११ रोजी निफ्टीने हे शिखर दाखविले होते. शेअर बाजारात निर्देशांकाच्या या दमदार उसळीला गुंतवणुकीतील सखोलता आणि गुंतवणूकदार संख्येतील व्याप्तीचीही जोड मिळावी, अशी अपेक्षा केली जात आहे. सरकारने नवगुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीर केलेली ‘राजीव गांधी इक्विटी योजना (आरजीईएसएस)’ आपल्या बाजाराची ही उणीव भरून काढेल, असा विश्वास मुंबईतील एका नामांकित शेअर दलालाने व्यक्त केला.
‘आनंदोत्सव साजरा करण्याची ही घडी बऱ्याच कालावधीनंतर आपल्याला अनुभवास येत आहे’, अशा शब्दात मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मोतीलाल ओसवाल यांनी ताज्या तेजीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. नव्या वर्षांची सुरुवातच मोठय़ा आशावादाने झाली आहे. असेच सुरू राहिले तर बाजाराला नवीन उच्चांक मार्चपूर्वीच दिसेल. माझ्या मते आजवर काठावर बसून प्रतीक्षा करणारे बरेच गुंतवणूक आता अपरिहार्यपणे बाजारात ओढले जातील, असा विश्वास  ओसवाल यांनी व्यक्त केला.
आपल्या शेअर बाजाराच्या ताज्या घोडदौडीमागे सरलेल्या डिसेंबरमधील देशातील उद्योगधंद्यांच्या विशेषत: निर्माण क्षेत्राबाबत पुढे आलेली उत्साहवर्धक अहवालाने चांगलाच वेग दिला आहे, असे मत निर्मल बंग सिक्युरिटीज्ने आपल्या ताज्या अहवालात व्यक्त केले आहे. अशाच प्रकारची प्रतिक्रिया इंडिया इन्फोलाइनचे संशोधन प्रमुख अमर अंबानी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, सरकारची आर्थिक आघाडीवर धोरणात्मक धडाडी बाजाराला पुढे जाऊन अधिकच प्रेरक ठरेल.
मानसिकदृष्टय़ा ६,००० ही अत्यंत अवघड पातळी असून, तब्बल दोन वर्षांनंतर ती ओलांडली गेली आहे. त्यामुळे पुढचा प्रवास आता बऱ्यापैकी सुकर झाला असल्याची प्रतिक्रिया सीएनआय रिसर्चचे किशोर ओस्तवाल यांनी व्यक्त केली.
सेन्सेक्स आणि निफ्टीही
दोन वर्षांच्या उच्चांकावर
गेल्या दशकभरातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांची नव्या वर्षांरंभीची ही सर्वात दमदार सुरुवात आहे. पहिल्या दिवसाची पाऊण टक्क्यांच्या वाढीत आज पुन्हा तितकीच भर घालून दोन्ही निर्देशांकांनी दोन वर्षांपूर्वीचा उच्चांक पुन्हा सर केला. बुधवारच्या तेजीच्या बाजारात सेन्सेक्समधील ३० पैकी २३ समभागांचा भाव वधारला. चीनमधून आयात होणाऱ्या इन्सुलेटर्सवरील आयातशुल्कात वाढीच्या सरकारच्या निर्णयामुळे भेलचा समभाग २%, तर दुचाकी विक्रीत दोन अंकी वाढ पुन्हा गाठणारा बजाज ऑटो ३.६ टक्क्यांनी वधारला.
दोन वर्षांत ४५ हजार कोटींचे गुंतवणूक नियोजन आणि आशिया, आफ्रिका अशा नव्या क्षेत्रातील बाजारपेठा काबीज करण्याचे टाटा समूहाचे महत्त्वाकांक्षी नियोजन आहे.
सायरस मिस्त्री अध्यक्ष, टाटा समूह
नामांकित दलाल पेढय़ांनी २०१३ मधील खरेदीसाठी केलेल्या शिफारशी
कोटक सिक्युरिटीज्     
*  पेट्रोनेट एलएनजी
लक्ष्य रु. १७७
*  आयसीआयसीआय बँक
लक्ष्य रु. १,२८६
* आर्शिया इंटरनॅशनल
लक्ष्य रु. १८८
*  इंजिनीयर्स इंडिया
लक्ष्य रु. २७५
* मॅरिको
रु. २४८
इंडिया निवेश सिक्युरिटीज्    
*  बीएएसएफ इंडिया
लक्ष्य रु. ७७९
* जीआयसी हौसिंग
लक्ष्य रु. १६०
*  जे पी असोसिएट्स
लक्ष्य रु. १६३
*  ओएनजीसी
*  आदित्य बिर्ला नुव्हो
लक्ष्य रु. १२००
  आयसीआयसीआय डिरेक्ट      
* टीसीएस
लक्ष्य रु. १,४६०
*  बालकृष्ण इंडस्ट्रीज
रु. ३५६
*  टेक महिंद्र
रु. ११५०
*  पेज इंडस्ट्रीज
रु. ४१०९
*  महिंद्र लाइफस्पेस
रु. ५०५
* हैडलबर्ग सीमेंट
रु. ६९
  मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस      
*  मॅक्लॉइड रसेल
लक्ष्य रु. ४१०
*  मारुती सुझूकी
रु. १७३०
*  एनएमडीसी
रु. २१७
* डीएलएफ
रु. २८६
*  इंडसइंड बँक
रु. ५००
*  करूर वैश्य बँक
रु. ७२५
  विदेशी वित्तसंस्थांच्या शिफारशी   
*  बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच टाटा मोटर्स लक्ष्य रु. ३६०
  जेपी मॉर्गन
 ग्लेनमार्क फार्मा लक्ष्य रु. ५७५
*  सीएलएसए
आयसीआयसीआय बँक रु. १४००
*  नोमुरा
गोदरेज कन्झ्युमर  लक्ष्य रु. ८३३