09 March 2021

News Flash

निर्देशांक तेजीचा दशम-सूर

‘निफ्टी’ १२ हजारांच्या वेशीवर

(संग्रहित छायाचित्र)

 

बँकिंग आणि वित्तीय सेवा समभागांमधील अंतिम टप्प्यात दिसून आलेल्या खरेदी बहरामुळे, भांडवली बाजारात निर्देशांकांनी सलग १० व्या दिवशी सकारात्मक वाढ कायम राखली. माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात नफावसुलीमुळे झालेल्या घसरणीनेही निर्देशांकाच्या विजयी दौडीच्या सातत्याला बुधवारी बाधा आणली नाही.

सत्राची सुरुवात कमजोरीने करीत, सेन्सेक्सने सत्र अखेरीच्या अंतिम तासात साधलेल्या सरशीमुळे, बुधवारी बाजारातील व्यवहार थंडावले तेव्हा १६९.२३ अंशांची कमाई करीत ४०,७९४.७४ वर मजल मारली. बरोबरीने निफ्टी निर्देशांकानेही ३६.५५ अंशांच्या कमाईसह तांत्रिक आणि भावनिक दोन्ही दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या १२ हजारांच्या वेशीपर्यंत सरकणारे पुढचे पाऊल टाकले. सत्रअखेरीस या निर्देशांकाने ११,९७१.०५ वर विश्राम घेतला.

वित्तीय सेवा क्षेत्रातील बजाज फिनसव्‍‌र्ह ३.८७ टक्क्यांच्या मुसंडीसह ‘सेन्सेक्स’मधील वधारणाऱ्या समभागात अग्रेसर ठरला. बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी वगैरे वाढ साधणाऱ्या समभागांमध्ये बँकांचाच बोलबाला दिसून आला. उल्लेखनीय म्हणजे यात मिडकॅप समभागांनी मोलाचे योगदान दिले आणि बीएसई मिडकॅप निर्देशांक अर्धा टक्क्याची वाढ साधणारा ठरला.

टाळेबंदी शिथिलतेचे व्यवसायचक्रांवर दिसत असलेले सकारात्मक परिणाम, जुलै ते सप्टेंबर तिमाहीत कंपन्यांच्या वित्तीय कामगिरीतील लक्षणीय सुधार, रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना अर्थउभारीसंबंधी केलेले भाष्य, अर्थव्यवस्थेत प्रत्यक्षात फेरउभारीचे दिसून येत असलेले हिरवे अंकुर आणि केंद्र सरकारकडून लवकरच करोना कहराने बेजार झालेल्या उद्योग क्षेत्रांना उत्तेजन म्हणून पॅकेजच्या घोषणा होतील या आशावादाने गेले काही दिवस बाजाराने जोरदार आगेकूच सुरू ठेवली आहे.

सर्वाधिक लांबलेली दौड..

सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी सलगपणे सुरू ठेवलेली ही सर्वाधिक लांबलेली घोडदौड आहे. मागील वेळी २०१८ सालात, व्यवहार झालेले सलग नऊ दिवस म्हणजे ५ एप्रिल ते १७ एप्रिल या दरम्यान तेजी सुरू राहून  सेन्सेक्सने १,३७६ अंशांनी वाढ साधली होती. यंदा २९ सप्टेंबरपासून सुरू झालेली विजय मालिका बुधवापर्यंत (१४ ऑक्टोबर) कायम राहून, या व्यवहार झालेल्या सलग १० सत्रांमध्ये सेन्सेक्सने २,८२१.३२ अंशांची कमाई केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 12:27 am

Web Title: nifty at 12000 gates abn 97
Next Stories
1 घाऊक महागाई दर सात महिन्यांच्या उच्चांकी
2 इन्फोसिसमध्ये कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, पदोन्नती
3 देशाच्या अर्थव्यवस्थेचे १०.३ टक्क्य़ांनी पतन
Just Now!
X