15 July 2020

News Flash

निफ्टी १० हजाराच्या वेशीवर

अर्थ-उभारीच्या आशेने सलग पाचवी निर्देशांकवाढ

संग्रहित छायाचित्र

भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकांनी मंगळवारी सलग पाचव्या सत्रात वाढीचे सातत्य राखले. टाळेबंदीपश्चात अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर येत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था लवकरच उभारीही घेईल यासाठी उद्योगक्षेत्राला शक्य ते सर्व पाठबळ देण्याच्या दिलेल्या ग्वाहीचा बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला.

जागतिक पतमानांकन संस्था मूडीज्कडून झालेल्या पत-कपातीसारख्या प्रतिकूल घटनेकडे दुर्लक्ष करीत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी ५२२.०१ अंशांनी उसळला. १.५७ टक्क्य़ांच्या या निर्देशांक वाढीने सेन्सेक्सने दिवसअखेर ३३,८२५.५३ पातळी गाठली. बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक १५२.९५ अंश वाढीसह, १० हजाराच्या वेशीजवळ ९,९७९.१० पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. उल्लेखनीय म्हणजे अर्थव्यवस्थेच्या फेरउभारीत मोलाचे योगदान असणाऱ्या बँका आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील समभागांना मंगळवारी बाजारात खरेदीचे पाठबळ मिळाले.

परिणामी, सेन्सेक्समधील बजाज फायनान्स, कोटक बँक, इंडसइंड बँक आदी जवळपास आठ टक्क्य़ांच्या घरात, तर एचडीएफसी, पॉवर ग्रिड, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि एल अँड टी यांचे समभागमूल्य वधारले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना, अर्थचक्र सुरू होईल इतकेच नव्हे तर अर्थव्यवस्थेला लवकरच पूर्ववैभव प्राप्त होईल अशा विश्वास व्यक्त केला. टाळेबंदीच्या काळात संकटालाच आव्हान बनवून हाती घेण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे अर्थवृद्धीच्या दिशेने फलित दिसून येईल, असेही त्यांनी विधान केले. केंद्र सरकारची आर्थिक सुधारणांबाबत कटिबद्धता आणि त्यासंबंधाने आश्वासक वाटचाल सुरू असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगणे हे गुंतवणूकदार वर्गाला सुखावणारे ठरले. आदल्या दिवसात मूडीज्कडून झालेल्या पत-कपातीचा वारही त्यामुळे बाजाराला पचविता आला, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 3:07 am

Web Title: nifty at the gate of 10 thousand abn 97
Next Stories
1 एलआयसी-आयडीबीआय बँक हिस्साविक्री चालू वर्षांत अवघड
2 करोनाकाळात ‘लवचीक’ वित्तीय उत्पादनांना पसंती
3 सुरळीत अर्थव्यवस्थेचे स्वागत
Just Now!
X