देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार सलग दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला. अवघ्या एक दिवसाच्या अंतरातील विक्रमी व्यवहाराने तो आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात ९,००० पर्यंत झेपावला. दिवसअखेर तो या आकडय़ावर स्थिरावू शकला नसला तरी ३९.५० अंशवाढीसह त्याचा सर्वोच्च स्तर मात्र कायम राहिला, तर सेन्सेक्सही आता महिन्याच्या वरच्या टप्प्यावर आहे. सेन्सेक्स मंगळवारी १३४.५९ अंशांनी वाढून २९,५९३.७३ पर्यंत पोहोचला, तर निफ्टी ८,९९६.२५ वर आहे.
प्रमुख भांडवली बाजारांनी सलग चौथ्या व्यवहारात तेजी नोंदविली आहे. शनिवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाच्या रूपात आर्थिक सुधारणांचे चित्र दिसत असल्याचे मानून विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनीही सलग खरेदीचा सपाटा ठेवला. रिलायन्स, टीसीएस, सन फार्मासारख्या आघाडीच्या समभागांना त्यांच्याकडूनही मागणी राहिली. एकूण निर्देशांकांच्या तेजीबरोबर निवडक कंपनी समभागांनीही त्यांचे सर्वोच्च मूल्य मंगळवारी प्राप्त केले.
निफ्टी व्यवहारात ९,००८.४० पर्यंत झेपावला. यापूर्वी सत्रातील त्याचा सर्वोच्च स्तर ३० जानेवारी रोजी ८,९९६.६० होता. तर बंदअखेरचा टप्पा त्याने कालच्याचप्रमाणे मंगळवारीही मोडीत काढला. मंगळवारी निफ्टी ८,९५६.७५ वर पोहोचला होता. निर्देशांकाची गेल्या चार व्यवहारांतील ही ३.५ टक्क्य़ांची वाढ आहे, तर सेन्सेक्सची या कालावधीतील भर ही ८५० अंशांची आहे.
एचएसबीसीचा निराशाजनक खरेदी व्यवस्थापक निर्देशांक तसेच जानेवारीमधील प्रमुख उद्योग क्षेत्रांची गेल्या चार महिन्यांतील सुमार कामगिरी असे ताजे चित्र असतानाही बाजारात मात्र उत्साह संचारला. विकासाभिमुख अर्थसंकल्पीय उपाययोजना चालू संसदीय अधिवेशनातच वेग घेतील, असा गुंतवणूकदारांचा विश्वास कायम होता. थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्य़ांपर्यंत वाढविणारे विमा विधेयक तसेच कोळसा खाण विधेयक संसदेत पारित होण्याची आशा गुंतवणूकदारांनाही आहे.
रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी, सन फार्मा हे दोन टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात उंचावले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तेल व वायू विपणन, शुद्धीकरण तसेच माहिती तंत्रज्ञान, आरोग्यनिगा यांच्यात तेजी नोंदली गेली, तर स्थावर मालमत्ता, वाहन, पोलाद, बँक समभागांमध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला. सेन्सेक्समधील १९ समभागांचे मूल्य वाढले. सिप्ला, बजाज ऑटो, सेसा स्टरलाइट, टाटा पॉवर, विप्रो, हिंदाल्को, हिरो मोटोकॉर्प यांचीही तेजीला साथ राहिली.
२९,५०० पुढील वाटचाल सलग दुसऱ्या दिवशी कायम ठेवणाऱ्या मुंबई निर्देशांकाची सुरुवातच तेजीसह झाली. सत्रात सेन्सेक्स २९,६३६.८६ पर्यंत उंचावला, तर त्याचा व्यवहारातील तळ २९,३६४.८७ इतकाच होता. या बाजार व्यासपीठावरील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांक प्रत्येकी एक टक्क्य़ाने वाढले.