चिनी बाजारपेठांना साथ देणारी गेल्या सलग चार व्यवहारांतील निर्देशांकातील घसरण सप्ताहअखेर थांबली. चीनमधील प्रमुख निर्देशांकांच्या वाढीनंतर येथेही सेन्सेक्स तसेच निफ्टीत वाढ नोंदली गेली. ८२.५० अंशांनी वाढणारा सेन्सेक्स २४,९३४.३३ पर्यंत पोहोचला खरा; मात्र त्याला व्यवहारातील २५ हजारांवरील टप्पा सत्रअखेरही राखता आला नाही. टाटा मोटर्स, रिलायन्स, आयटीसीच्या जोरावर मुंबई निर्देशांक शुक्रवारी त्याच्या १९ महिन्यांच्या तळातूनही बाहेर आला. तर निफ्टीही ७,६०० च्या पुढे गेला. सप्ताहअखेरची निर्देशांकाची कामगिरी सकारात्मक झाली असली तरी हा आठवडा नोव्हेंबर २०११ नंतरचा सुमार सप्ताह ठरला.

डॉलरच्या तुलनेत भक्कम होत असलेल्या रुपयांमुळेही आठवडय़ाच्या शेवटच्या व्यवहारात बाजारात भर पडली. गेल्या आठवडय़ाभरात सेन्सेक्स १,२२६.५७ (-४.६८%) तर निफ्टी ३६१.८५ (-४.५४%) अंशांने कोसळला आहे. चीनबरोबरच सौदी, उत्तर कोरिया देशांच्या राजकीय निर्णयाने बाजार या दरम्यान प्रभावित झाला होता. गेल्या शुक्रवारचे सत्र सोडता २०१६ मधील सर्व व्यवहारांत यापूर्वी येथील निर्देशांकांमध्ये घसरण झाली.

२५ हजारांखाली २४,९६९.०२ ने आठवडय़ातील अखेरच्या दिवसाच्या व्यवहाराची सुरुवात करणारा सेन्सेक्सने २५ हजारांचा टप्पाही गाठला. दुपारपूर्वीच निर्देशांक २५,०८३.५५ या सत्रातील सर्वात वरच्या स्तरावर होता. दिवसअखेरच्या व्यवहारात गुंतवणूकदारांकडून पुन्हा नफेखोरी अवलंबिल्याने गेल्याने मुंबई निर्देशांकाला त्याचा २५ हजारांवरील टप्पा दिवसअखेरही कायम राखता आला नाही. तर निफ्टीला ७,६०० वरील पातळी राखण्यात यश आले.

एचडीआयएल, डीएलएफ, ओबेरॉय रिएल्टी, यूनिटेक, फिनिक्स, इंडियाबुल्स रिअल इस्टेट, गोदरेज प्रॉपर्टीज, एनबीसीसीसारख्या समभागांचे मूल्य ५.७६ टक्क्यांपर्यंत वाढले. तर सेन्सेक्समधील १७ समभागांना मागणी राहिली. २.३१ टक्क्यांसह स्थावर मालमत्ता निर्देशांक तेजीत सर्वात पुढे राहिला. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्येही अनुक्रमे १.३२ व १.२४ टक्के वाढ झाली.

भांडवली बाजाराचा पुढील आठवडय़ाचा प्रवास कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालावर अवलंबून असेल. यंदाच्या हंगामाची सुरुवात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकांची इन्फोसिस ही १२ जानेवारीपासून करत आहे.

चिनी बाजाराचा ‘सर्किट’लाच ब्रेक!

अर्थमंदीच्या चिंतेला प्रतिक्रिया म्हणून आठवडय़ात दोन वेळा ‘सर्किट ब्रेकर’ लागेल इतकी पड सोसणाऱ्या चीनच्या बाजाराचे प्रमुख निर्देशांक शुक्रवारी २ टक्क्यांपर्यंत उंचावले. तेथील बाजार नियामकाने ही तांत्रिक यंत्रणाच मोडीत काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर शांघाय, शेनझेन अशा दोन्ही बाजारांचे निर्देशांक उसळले. यातून या दोन बाजारातील उलाढालही एकाच सत्रात ११६.०३ अब्ज डॉलरच्या वर गेली. ‘सर्किट ब्रेकर’मुळे गुरुवारी पहिल्या अध्र्या तासातच बाजारातील व्यवहार गुंडाळण्याची नामुष्की चीनवर ओढवली, तर त्याचे गंभीर पडसाद जगभरच्या बाजारात उमटले. चीनच्या ताज्या निर्णयामुळे युरोप तसेच अमेरिकेतील बाजारांची सुरुवातही तेजीसह झाली.