गुरुवारच्या मोठय़ा आपटीनंतर सेन्सेक्सने सप्ताहअखेर काहीशा निर्देशांक वाढीने केली. ३८.४३ अंश वाढीसह सेन्सेक्स २७,८६५.९६ वर पोहोचला, तर १९.९० अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला त्याचा ८,६०० स्तर पुन्हा गाठता आला. प्रमुख निर्देशांक दिवसअखेर ८,६११.१५ वर स्थिरावला.

सीमारेषेवरील लष्करी कारवाईमुळे भारत-पाकिस्तान देशांमध्ये तणाव निर्माण झाल्याची भीती व्यक्त सेन्सेक्सने गुरुवारी ४६५ अंश निर्देशांक आपटी नोंदविली होती. शुक्रवारच्या सत्रातील व्यवहार काहीसे दोलायमान राहिले. डॉलरच्या तुलनेत भक्कम होत असलेला रुपया त्याचबरोबर येत्या आठवडय़ात व्याजदरबाबत रिझव्‍‌र्ह बँकेची होत असलेली बैठक आदी भिन्न कारणे त्यासाठी राहिली.

तेल व वायू, पायाभूत सेवा, ऊर्जा, वाहन, सार्वजनिक उपक्रम, पोलाद आदी निर्देशांकांमध्ये मागणी नोंदली गेली. सेन्सेक्समधील निम्मे, १५ समभाग तेजीत तर तेवढेच घसरणीच्या यादीत राहिले. मुंबई निर्देशांकात महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र सर्वाधिक, ३.०६ टक्क्यांसह वाढला. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे २.१३ व १.९५ टक्क्यांनी वाढले. सप्ताहात मात्र सेन्सेक्स ८०२.२६ अंशांनी तर निफ्टी २२०.४० अंशांनी घसरला आहे.