News Flash

अडथळ्यानंतरही निफ्टीचा विक्रम!

सेन्सेक्सची २५ मेनंतरची सत्रातील सर्वोत्तम झेप सोमवारी नोंदली गेली

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

 

आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशीच्या सुरुवातीच्या व्यवहाराला सर्वोच्च टप्प्याला गवसणी घालणारे प्रमुख निर्देशांक सोमवारी दिवसअखेरही कायम राहिले. राष्ट्रीय शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारातच तांत्रिक अडचण निर्माण तब्बल अडिच ते तीन तास व्यवहार ठप्प ठेवूनही निफ्टी प्रथमच ९,७०० या वरच्या टप्प्यावर पोहोचला. तर एकाच व्यवहारातील तब्बल ३५५ अंश वाढ नोंदवून मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ३१,७१५.६४ हे विक्रमी शिखर गाठले.

देशातील सर्वात मोठय़ा भांडवली बाजाारात दुपापर्यंत फ्युचर अँड ऑप्शन्स प्रकारातील व्यवहार ठप्प पडल्यानंतरही एकूणच भांडवली बाजारात दिवसभर तेजीचे वातावरण राहिले.

सेन्सेक्सची २५ मेनंतरची सत्रातील सर्वोत्तम झेप सोमवारी नोंदली गेली. मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने यापूर्वी गेल्याच आठवडय़ात सर्वोच्च बंद स्तर नोंदविला होता.

एयू स्मॉल फायनान्स बँकेची वधारतीनोंद

जारी केलेल्या समभाग मूल्यापेक्षा तब्बल ५१ टक्के अधिक प्रतिसाद मिळवत एयू स्मॉल फायनान्स बँकेची सोमवारी भांडवली बाजारात सूचिबद्धता झाली. बँकेने जारी केलेल्या समभागाचे मूल्य ३५८ रुपये होते. मात्र सकाळच्या सत्रातील पदार्पणात समभाग ५२५ रुपयांवर नोंद झाला. सत्रात ५२.२३ टक्क्य़ांपर्यंत झेपावत तो ५४५ रुपयांवर पोहोचला. अखेर जारी मूल्यापेक्षा त्याला ५१.१७ टक्के अधिक भाव होत ५४१.२० रुपयांवर बंद झाला. बँकेच्या समभागाचा हा पदार्पण प्रवास मुंबई शेअर बाजारातील होता. तांत्रिक अडचणींमुळे राष्ट्रीय शेअर बाजार मंचावर त्याचा अंतिम प्रतिसाद कळू शकला नाही. बँकेचे बाजारमूल्य आता १५,३८३.६६ कोटी रुपये झाले आहे. २८ ते ३० जून दरम्यान राबविले गेलेल्या कंपनीच्या खुल्या भागविक्री प्रक्रियेला ५३.६० प्रतिसाद मिळाला होता. यामार्फत १,९१२ कोटी रुपये उभारण्यात आले होते. प्रक्रियेकरिता समभाग किंमतपट्टा ३५५ ते ३५८ रुपये असा होता. बँकेला रिझव्‍‌र्ह बँकेकडून डिसेंबर २०१६ मध्ये परवाना मिळाला होता.

गुंतवणूकदार २ लाख कोटी डॉलरने श्रीमंत

सर्वोच्च टप्प्यावर पोहोचलेल्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या मालमत्तेनेही सोमवारी २ लाख कोटी डॉलर असा अनोखा टप्पा गाठला. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग मूूल्य सोमवारी १.२९ कोटी रुपयांवर पोहोचले. अमेरिकी डॉलरमध्ये ते २ लाख कोटी डॉलर आहे. अवघ्या ७ पैशांनी उंचावत डॉलरच्या तुलनेत रुपयानेही सोमवारी ६४.५३ असा पंधरवडय़ातील उच्चांक गाठला.

विलीनीकरण भागीदार कंपन्यांमध्ये संमिश्र हालचाल

विलिनीकरणाच्या घोषणेनंतर प्रमुख प्रवर्तक आयडीएफसी लिमिडेट आणि श्रीराम समूहातील कंपन्या यांचे समभाग मूल्य सोमवारी भांडवली बाजारात ५.७ टक्क्य़ांपर्यंत घसरले.

आयडीएफसी लिमिडेटमध्ये श्रीराम समूहातील काही कंपन्या सामील करून घेण्याबाबतची घोषणा शनिवारी झाली होती. मात्र गेले दोन दिवस भांडवली बाजारात व्यवहार झाले नसल्याने त्याची प्रतिक्रिया सोमवारी अपेक्षेप्रमाणे उमटली.

प्रमुख आयडीएफसी लिमिटेडचा समभाग व्यवहारात ६ टक्क्य़ांपर्यंत घसरला होता. तर आयडीएफसी बँकेचे समभाग मूल्य मात्र नाममात्र, ०.६९ टक्क्य़ांनी वाढले.

  • आयडीएफसी लिमिटेड          रु.५६.५० -५.६८%
  • आयडीएफसी बँक          रु.६५.२० +०.६९%
  • श्रीराम सिटी यूनियन फायनान्स   रु.२,३४९.२० -५.५६%
  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स  रु.१,०५४.३५ -३.३३%

एनएसईच्या मंचावर तांत्रिक अडथळा

प्रमुख निर्देशांक सकाळच्या सत्रात उच्चांकाला पोहोचले असतानाच सोमवारी देशातील सर्वात मोठय़ा राष्ट्रीय शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये अडथळा निर्माण झाला. फ्युचर अँड ऑप्शन गटातील व्यवहार यामुळे सकाळच्या सत्रात दोन वेळा बंद ठेवण्यात आले होते. अखेर दुपारी १२.३० च्या सुमारास ते पुन्हा सुरू करण्यात आले. राष्ट्रीय शेअर बाजार मंचाने यामुळे गुंतवणूकदारांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून संबंधित त्रुटीची चाचपणी करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान सरकारनेही याबाबत मंचाकडून सविस्तर माहिती मागविली आहे. तर भांडवली बाजार नियंत्रक सेबीनेही आपण स्थिती अवलोकनार्थ असल्याचे म्हटले आहे. दुपारी बाजार बंद झाल्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजाराने स्पर्धक मुंबई शेअर बाजाराला अचानक वाढलेल्या समभाग खरेदी-विक्री व्यवहाराबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. मुंबई शेअर बाजाराच्या समभागांचे व्यवहार राष्ट्रीय शेअर बाजारात फेब्रुवारी २०१७ पासून होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2017 2:36 am

Web Title: nifty goes up share market sensex bse nse
Next Stories
1 ‘जीएसटी’पूर्वी प्रवासी वाहन विक्रीत घसरण
2 देशातील ५५ टक्के जनता ‘जीएसटी’विषयी अनभिज्ञ
3 नवउद्यमींचा ‘ऑनलाइन ते ऑफलाइन’ प्रवास
Just Now!
X