२१५ अंशांच्या घसरणीने सेन्सेक्स तीन आठवडय़ापूर्वीच्या पातळीवर
कंपन्यांच्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाही निकाल हंगामाची चिंता वाहताना गुरुवारी मुंबई निर्देशांक त्याच्या गेल्या तीन आठवडय़ांच्या तळात विसावला. एकाच व्यवहारात २१५.२१ अंशांनी घसरलेला सेन्सेक्स दिवसअखेर २४,६८५.४२ वर स्थिरावला, तर ६७.९० अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,६०० स्तर सोडत ७,५४६.४५ वर राहिला.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या केवळ पाव टक्का दरकपातीने भांडवली बाजाराने मंगळवारी मोठी आपटी नोंदविली होती. त्यानंतर बुधवारचे बाजाराचे व्यवहार किरकोळ वाढीसह झाले. २४,९९८.७९ या वरच्या स्तरावर सुरू झालेला सेन्सेक्स सत्रात २५,००० पर्यंत गेला. मात्र दिवसअखेर त्यात बुधवारच्या तुलनेत मोठी घसरण झाली.
भांडवली बाजाराच्या गुरुवारच्या घसरणीला अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेची जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानेही कारणीभूत ठरली. मात्र अधिक परिणाम कंपन्यांच्या लवकरच जाहीर होणाऱ्या तिमाही निकालांचा झाला. आर्थिक मंदीच्या सावटात कंपन्यांचा ताळेबंद कसा असेल, याबाबतच्या अस्वस्थतेने गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केली.
गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स २५,०१३.१३ ते २४,६४७.४८ दरम्यान राहिला. बंदअखेर जवळपास एक टक्क्य़ांची घसरण नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचा हा १७ मार्चनंतरचा किमान स्तर होता. तर व्यवहारात ७,६३०.७५ ते ७,५४६.८५ असा प्रवास करणाऱ्या निफ्टीने दिवसअखेर ७,६००चाही स्तर सोडला.
सेन्सेक्समध्ये अदानी पोर्ट्स, मारुती सुझुकी, एचडीएफसी लिमिटेड, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, आयटीसी, इन्फोसिस, विप्रो, टाटा स्टील, हिंदुस्थान यूनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, बजाज ऑटो, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक यांचे समभाग घसरले.
सेन्सेक्समधील १८ समभागांचे मूल्य रोडावले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये विद्युत उपकरण निर्देशांक सर्वाधिक २ टक्क्य़ांनी घसरला. त्यानंतर भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान, वाहन, बँक, स्थावर मालमत्ता या निर्देशांकांतही घसरण राहिली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये अध्र्या टक्क्य़ापर्यंतची घसरण झाली.