सप्ताहारंभीच्या मोठय़ा निर्देशांक आपटीसह भांडवली बाजाराचा गेल्या सलग तीन व्यवहारांतील घसरण प्रवास अखेर मंगळवारी थांबला. सेन्सेक्ससह निफ्टी निर्देशांकाने मंगळवारी जवळपास अर्ध्या टक्क्याहून अधिक प्रमाणात वाढ नोंदविली. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी निर्देशांक वाढ नोंदविणाऱ्या पश्चिमेतील तसेच आशियातील इतर निर्देशांकवाढीचा हा परिणाम होता.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी, सोमवारच्या तुलनेत १६७.१९ अंश  वाढीसह ३०,१९६.१७ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ५५.८५ अंश वाढ नोंदवीत ८,८७९.१० पर्यंतचा स्तर अनुभवला. भांडवली बाजारात मंगळवारी अस्थिर व्यवहार झाले. परिणामी प्रमुख निर्देशांकही घसरण-तेजी असा प्रवास करते झाले.

वाढीव तोटा वगळता इतर बाबतीत गेल्या तिमाहीत उत्तम आर्थिक कामगिरी बजाविणाऱ्या भारती एअरटेलचा समभाग सेन्सेक्सच्या तेजीच्या यादीत अव्वल राहिला. तसेच ओएनजीसी, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, पॉवरग्रिड, एनटीपीसी आदींचेही मूल्य वाढले.

तर इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक हे समभाग मात्र घसरणीच्या यादीत राहिले. सेन्सेक्समधील ८ समभाग घसरले. तर २२ समभागांचे मूल्य वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, बहुपयोगी वस्तू, वाहन निर्देशांक २.५० टक्क्यांपर्यंत वाढले. भांडवली वस्तू, स्थावर मालमत्ता, बँक निर्देशांक मात्र घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप ०.५२ टक्क्याने वाढला. तर स्मॉल कॅ प ०.२० टक्क्याने घसरला.