• दोन दिवसांत गुंतवणूकदारांच्या ९.७४ लाख कोटींचा चुराडा
  • ‘सेन्सेक्स’ची ८१० अंश आपटी; दिवसभरात १४०० अंशांची उलटफेर

 

मुंबई : भांडवली बाजारातील मोठी निर्देशांक घसरण मंगळवारीही कायम राहिली. मात्र याआधीच्या सत्रातील घसरगुंडीच्या तुलनेत  दिवसाची सुरुवात सकारात्मक, तर सत्र अखेरीस शेवटच्या तासाभरात ‘सेन्सेक्स’ने तब्बल १,४०० अंशांची गटांगळी दाखविली. दोन्ही प्रमुख निर्देशांक सत्रअखेर अडीच टक्क्यांनी रोडावले. सप्ताहारंभीच्या तुलनेत मंगळवारच्या व्यवहारात १,६५३ अंशांनी आपटणारा सेन्सेक्स अखेर ८१०.९८ अंशांनी घसरून ३०,५७९.०९ वर स्थिरावला. तर २३०.३५ अंश घसरणीसह निफ्टी ८,९६७.०५ पर्यंत पोहोचला. भांडवली बाजाराच्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी त्यांचे अनोखे टप्पे सोडले. मार्च २०१७ नंतर त्यांनी मंगळवारचा बंदतळ अनुभवला आहे. जागतिक बाजारही आघाडीच्या निर्देशांकांची पडझड मंगळवारीही कायम होती.

मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध एकूण कंपन्यांचे बाजार भांडवल मंगळवारी २.१२ लाख कोटी रुपयांनी कमी झाले. सोमवारच्या १२१.६३ लाख कोटी रुपयांवरून ते ११९.५२ लाख कोटी रुपयांवर आले. गेल्या दोन दिवसात बाजार भांडवल ९.७४ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. अर्थात एवढय़ा रकमेच्या गुंतवणूकदार मत्ता मातीमोल झाली आहे.

भारतात करोना विषाणूजन्य साथीचा प्रसार वेग घेत असून मृत्युमुखी व बाधितांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. परिणामी भांडवली बाजारात स्थानिक संस्थांत्मक गुंतवणूकदारांसह विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडूनही निधी काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी लिमिटेड, इन्फोसिस, कोटक महिंद्र बँक यांचे मूल्य थेट ९ टक्क्यांपर्यंत आपटले. त्याचबरोबर हिंदुस्थान यूनिलिव्हर, हिरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्स, पॉवरग्रिड, मारुती सुझुकी यांचेही मूल्य ३.५० टक्क्यांपर्यंत घसरले.

मुंबई निर्देशांकातील ३० पैकी २१ कंपन्यांचे समभागमूल्य रोडावले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक, वित्त, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता निर्देशांक ४.४६ टक्क्यांपर्यंत खाली आले. मिड कॅप व स्मॉल कॅप २.२७ टक्क्यांपर्यंत घसरले.