मुंबई : डिसेंबर २०२० मध्ये निफ्टी निर्देशांकाचे किंमत उत्पन्न गुणोत्तर १७.५ पट आणि मिळकतीचे प्रमाण ७६७ रुपये राहण्याचा अंदाज, कोटक सिक्युरिटीजने भविष्यवेधी अहवालात व्यक्त केला आहे. यानुसार निफ्टी १३,४०० अंशांची पातळी गाठेल, तर सेन्सेक्स आगामी वर्षसांगतेला ४५,५०० अंशांवर पोहोचलेला असेल, असा कयास आहे.

आगामी वर्षांत बँका, बँकेतर वित्तीय कंपन्या, तेल आणि वायू, भांडवली वस्तू, बांधकाम, आरोग्यनिगा व कृषी रसायन क्षेत्रातील चांगल्या कंपन्या हेरून त्यात गुंतवणुकीला प्राधान्य दिले जावे, असे कोटक सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी जयदीप हंसराज यांनी सुचविले. मिड आणि स्मॉल कॅप समभागांची कामगिरी सुधारत असल्याचे दिसत असले, तरी त्यांनी तीन वर्षांपूर्वीप्रमाणे लार्ज कॅपच्या तुलनेत मुसंडी दिसायला काही अवधी लागेल, असे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेत व्यापक सुधार, बँकांच्या पतपुरवठय़ात वाढ दिसून आल्यावरच दोन ते तीन वर्षांचा दृष्टिकोन राखून स्मॉल व मिड कॅप गुंतवणुकीकडे वळता येईल, असे हंसराज यांनी मत व्यक्त केले.