खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेची गुंतवणूकविषयक अंग आणि संपूर्ण अंगीकृत उपकंपनी अ‍ॅक्सिस कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी पदाचा नीलेश शाह यांनी त्याग केल्याचे अ‍ॅक्सिस बँकेने सोमवारी प्रसिद्धीपत्रकान्वये स्पष्ट केले. बँकेबाहेर अन्य संधी आजमावण्यासाठी ते पदत्याग करीत असल्याचे पत्रकात सूचित करण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंड उद्योगाने नेतृत्वपदावर अनेक फेरबदल अनुभवले, त्याची सुरुवात नववर्षांच्या प्रारंभापासून यंदा सुरू झाली. अ‍ॅक्सिस कॅपिटलमधून बाहेर पडून नीलेश शाह नीलेश शाह हे कोटक अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होत असल्याची चर्चा आहे. या संबंधाने अधिकृत स्र्रोतातून खुलासा मात्र होऊ शकलेला नाही. शाह यांच्याशीही संपर्क होऊ शकलेला नाही. संदेश किरकिरे यांनी कोटक अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद गेले काही महिने रिक्तच आहे.
गेली २० वर्षे भांडवली बाजाराचा अनुभव गाठीशी असलेले शाह हे माध्यमांमध्ये अ‍ॅक्सिस समूहाचा चेहरा व प्रवक्तेम्हणून प्रचलित आहेत. अ‍ॅक्सिसच्या सेवेत रुजू होण्यापूर्वी ते देशातील तिसरा मोठा म्युच्युअल फंड आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे सह-व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. तेथील त्यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळात या म्युच्युअल फंडाची एकूण मालमत्ता जवळपास चार पटीने वाढली होती.