कैलाश कुलकर्णी उपाध्यक्षपदी कायम

देशातील विविध ४२ फंड घराण्यांचे नेतृत्व करणाऱ्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ अर्थात ‘अ‍ॅम्फी’च्या अध्यक्षपदी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी (अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी) चे व्यवस्थापकीय संचालक आणि  मुख्याधिकारी निमेश शहा यांची नियुक्ती झाली आहे. तर एल अ‍ॅण्ड टी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी कैलाश कुलकर्णी हे पुन्हा उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत.

‘अ‍ॅम्फी’च्या गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांनी निवड करण्यात आली. या फंड संघटनेचे अध्यक्ष म्हणून २०१६ पासून आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालासुब्रमण्यन होते.

निमेश शहा यांना बँक तसेच वित्तीय सेवा क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीपूर्वी ते आयसीआयसीआय बँकेत कार्यरत होते. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीमार्फत ३.१० लाख कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन होत आहे.

आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या थकीत कर्ज प्रकरणावरून एकूणच म्युच्युअल फंड उद्योग चर्चेत आले असताना शहा यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकरणानंतर गेल्या काही दिवसांमध्ये भांडवली बाजारातून निधी कमी होत असतानाच समभाग संलग्न फंडांमध्ये मात्र निधी ओघ वाढता राहिला आहे. एकटय़ा सप्टेंबरमध्ये सेन्सेक्स ६.२ टक्क्यांनी घसरला आहे. म्युच्युअल फंडात पुन्हा निधी ओघ वाढण्यासाठी करावे लागणाऱ्या प्रयत्नांकरिता शहा यांची कसोटी लागणार आहे.

‘अ‍ॅम्फी’च्या संचालक मंडळात १५ संचालकांचा समावेश आहे. यामध्ये विविध फंड घराण्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिनिधित्व करतात. फंड उद्योगातील सप्टेंबर २०१८ अखेरची रक्कम २२.०६ लाख कोटी रुपये नोंदली गेली आहे. आधीच्या महिन्यात ती सर्वाधिक २५.२० लाख कोटी रुपये होती.