‘केवायसी’ नियमभंगाबद्दल कारवाई

नियमांची पूर्तता न केल्याबद्दल रिझव्‍‌र्ह बँकेने विविध चार सहकारी बँकांना एकूण ९ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन सहकारी बँकांचा समावेश आहे.

‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’बाबतच्या नियमांची पूर्तता न केल्याबद्दल पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर नागरी सहकारी बँकेला २ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. कर्ज वितरणाबाबतही या बँकेने नियम पाळले नसल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे. तर जळगाव जिल्ह्य़ातील श्री दादासाहेब गजमल सहकारी बँकेला (पाचोरा) परवानगीविना मालमत्तांवर शुल्क आकारणी केल्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

याचबरोबर दंड करण्यात आलेल्या दोन बँकांमध्ये गुवाहाटी येथील द को ऑपरेटिव्ह सिटी बँक व हैदराबाद येथील द मॉडल को-ऑप. अर्बन बँक यांचा समावेश आहे. या दोन्ही सहकारी बँकांना अनुक्रमे ५ व १ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. गुवाहाटीतील या बँकेने ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ची पूर्तता केली नसल्याचा तर हैदराबाद येथील सहकारी बँकेने तिचे संचालक व त्यांच्या नातेवाईकांना याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे धुडकावत कर्जे दिली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईतील द आर. एस. को-ऑप. बँकेच्या खातेदारांना १०,००० रुपयेपर्यंत रक्कम काढण्यास मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा १,००० रुपये होती.