सार्वजनिक क्षेत्रातील दहा बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर कामगार कपात करण्यात येणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकाही कर्मचाऱ्याला कामावरून काढण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी दहा बँकांचे विलिनीकरण करण्याच्या महा-विलय कार्यक्रमाची घोषणा केली होती. देशाने पाच लाख कोटी अमेरिकी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा स्तर गाठण्याचे उद्दिष्ट साकारण्यासाठी, देशाचे वित्तीय क्षेत्राची सशक्त पायाभरणी केली जाणे आवश्यक आहे. बँकांचे एकत्रीकरण हे त्या दिशेने पडलेले महत्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकत्रीकरणाचे फायदे विशद करताना, बँकांची कर्ज वितरण क्षमता, नफा क्षमता वाढण्यासह, यातून एकूण पत गुणवत्ताही सुधारत असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.
अर्थ मंत्रालयाच्या या निर्णयानंतर बँक कर्मचारी संघटनांनी याला विरोध करण्यास सुरूवात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागेल, अशी भीती संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सीतारामन म्हणाल्या, ही अगदी चुकीची माहिती आहे. मी शुक्रवारी काय म्हणाले होते, हे संघटना आणि प्रत्येकाने पुन्हा बघावे. बँक विलिनीकरणा बोलताना आम्ही स्पष्ट केले होते की, एकाही कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्यात येणार नाही. कदापि नाही, असे सीतारामन यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 1, 2019 5:07 pm