टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतल्यानंतर सायरस मिस्त्री यांच्याकडून स्थापित वेगवेगळ्या क्षेत्रातील श्रेष्ठ प्रतिभेच्या व्यक्तींच्या कार्यकारी मंडळात नवी भर ‘मार्केटिंग गुरू’ निर्माल्य कुमार यांच्या रूपाने येत्या १ ऑगस्टपासून पडत आहे. पाच लाख कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या टाटा समूहाची विपणनविषयक रणनीतीची धुरा त्यांच्याकडे असेल.
लंडन बिझनेस स्कूलमध्ये मार्केटिंग या विषयाचे प्राध्यापक असलेले निर्माल्य कुमार हे मिस्त्री यांच्या वेगवेगळ्या तज्ज्ञ क्षमता असलेल्या कार्यकारी मंडळात सामील झालेले चौथे सदस्य आहेत. या आधी समूहाच्या वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सच्या विकासासाठी मुकुंद राजन, व्यवसायविषयक उत्कर्षांसाठी मधू कन्नन, मनुष्यबळ विकासविषयक निर्णयांसाठी एन. एस. राजन यांची गेल्या वर्षभरात मिस्त्री यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली आहे.
कलकत्ता विद्यापीठातून बी.कॉम. पदवी मिळविल्यानंतर, कुमार यांनी शिकागोस्थित इलिनॉइस विद्यापीठातून एमबीए आणि नॉथवेस्टर्न विद्यापीठातून मार्केटिंग विषयातून पीएच.डी. पूर्ण केली. हार्वर्ड बिझनेस स्कूल, आयएमडी (स्वित्र्झलड) आणि केलॉग ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंट या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधूनही त्यांनी अध्यापन केले आहेत. कुमार यांनी यापूर्वी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर काम केले आहे.