सार्वजनिक उपक्रमांचे प्रमुखपद महिलांकडे असे वर्षभरापासून सुरू असलेल्या क्रमात नवीन भर म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल) या तेल विपणन कंपनीच्या अध्यक्षपदाची सूत्रे निशी वासुदेव यांच्याकडे येणार आहेत. फरक इतकाची की देशातील नवरत्न दर्जाच्या कंपनीची सूत्रे इतिहासात प्रथमच एका महिलेकडे येत आहेत.
एचपीसीएलचे विद्यमान अध्यक्ष सुबीर रॉय चौधरी हे २८ फेब्रुवारी २०१४ रोजी निवृत्त झाल्यावर निशी वासुदेव यांच्याकडे या पदाचा कार्यभार येईल. सरकारी कंपन्यांच्या प्रमुखपदावरील उमेदवाराची निवड करणाऱ्या सार्वजनिक सेवा निवड मंडळाने निशी यांच्या नावाची शिफारस सरकारला केली आहे. कंपनीत सध्या विपणन संचालक असलेल्या निशी यांच्यासह इतर सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखतीतून त्यांचे नाव अंतिम झाले आहे. केंद्रीय तेल व वायू खाते, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आणि पंतप्रधान कार्यालयाच्या मंजुरीनंतर निशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
भारतीय व्यवस्थापन संस्था, कोलकात्याच्या विद्यार्थिनी राहिलेल्या निशी यांनी सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल इंडियातून सेवेला सुरुवात केली. ५,९७५ कोटी रुपये भांडवली मूल्य असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियमने २०१२-१३ दरम्यान २,१५,६७५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे ढासळते मूल्य व आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती यांचा सध्या कंपनीला सामना करावा लागत आहे. हेच आव्हान पेलण्यास आपले प्राधान्य राहील, असे निशी यांनी आपल्या नियुक्तीबद्दल म्हटले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्सचे अध्यक्षपद यापूर्वी रिना रामचंद्रन यांनी भूषविले आहे. मात्र नवरत्न दर्जा मिळालेल्या कंपनीच्या अध्यक्षपदी आरूढ होण्याचा मान निशी यांच्या रूपाने पहिल्यांदाच एखाद्या महिला अधिकाऱ्याला मिळाला आहे. राष्ट्रीयीकृत स्टेट बँकेच्या अध्यक्षपदाकडे सध्या अरुंधती भट्टाचार्य यांची वाटचाल सुरू आहे. येत्या सप्टेंबरमध्ये निवृत्त होणाऱ्या प्रतीप चौधरी अध्यक्ष असलेल्या या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर त्यांची नियुक्ती गेल्याच आठवडय़ात करण्यात आली. त्या अध्यक्षा झाल्यास स्टेट बँकेच्या इतिहासात प्रथमच महिलेकडे प्रमुखपद येणार आहे.