वीरेंद्र तळेगावकर

सध्या खरेदीदारांची सर्वाधिक पसंती असलेल्या बहुपयोगी (एसयूव्ही)वाहन गटात उशिरा शिरकाव करीत जपानी वाहन निर्मात्या निसानने ‘किक्स’ ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही दाखल केली आहे. नव्या वर्षांच्या प्रारंभापासून ‘किक्स’च्या जोरावर या बाजारवर्गातील मातब्बर स्पर्धकांना कडवे आव्हान देण्याची निस्सानने तयारी केली आहे.

‘न्यू निस्सान किक्स’चे डिझाइन आणि वेग तसेच इंधनक्षमतेच्या अव्वलतेची अनुभूती देण्यासाठी भुज येथे मंगळवारी माध्यम प्रतिनिधींना हे वाहन चाचणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. ‘न्यू निस्सान किक्स’ प्रत्यक्षात जानेवारी २०१९ पासून बाजारात उपलब्ध होईल. तर वाहनांसाठीची नोंदणी डिसेंबरच्या मध्यापासून सुरू केली जाणार आहे. जमिनीपासूनचे वाहनाचे अंतर, वाहनाच्या चारी बाजूंना कॅमेरा यातून सुरक्षाविषयक वैशिष्टय़ात भर पडली. आतमध्ये दोन आसनांच्या दरम्यान अतिरिक्त जागा, अंतर्गत व बाह्य़ डिझाइन याबाबत किक्सचे स्पर्धकांच्या तुलनेत उजवेपण निश्चितच दिसून येते.

स्पर्धक कंपन्या व त्यांच्या या गटातील वाहनांचा उल्लेख न करता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी निस्सानचा देशाच्या वाहन क्षेत्रातील बाजारहिस्सा लवकरच सध्याच्या एक टक्क्यावरून दुहेरी अंकांपर्यंत नेण्याचा विश्वास व्यक्त केला. ‘किक्स’ला मिळणाऱ्या प्रतिसादातून ही किमया घडू शकेल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. निस्सानने तिचे भारतातील विक्री जाळेही येत्या तीन वर्षांत दुप्पट करणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र  किक्सची नेमकी किंमत काय असेल, याचा खुलासा कंपनीने केलेला नाही. शिवाय या व अन्य गटात येऊ घातलेल्या नवीन वाहनांबाबत कंपनीकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नाही.

भारतीय कॉम्पॅक्ट एसयूव्ही क्षेत्रात सध्या मारुतीची विटारा ब्रीझा, ह्य़ुंदाईची क्रेटा अव्वल स्थानावर आहे. टाटा मोटर्सची नेक्सॉन, महिंद्रचेही या गटात नवे वाहन येऊ घातले आहे.