बहुराज्यात शाखा विस्तार असलेल्या एनकेजीएसबी सहकारी बँकेने चालू आर्थिक वर्षांसाठी निश्चित केलेले १०० शाखा आणि १०,००० कोटी रुपयांचे व्यवसायाचे उद्दिष्ट येत्या डिसेंबरमध्येच गाठले जाईल, असे स्पष्ट केले आहे.
बँकेकडून शाखांचे शतक पुढील महिन्याभरात गाठले जाईल, असे एनकेजीएसबीचे व्यवस्थापकीय संचालक चिंतामणी नाडकर्णी यांनी सांगितले. बँकेच्या सध्या ९८ शाखा असून लवकरच त्यात दोन नवीन शाखांची भर पडेल. तर डिसेंबपर्यंत बँकेचा एकूण व्यवसाय १० हजार कोटींपल्याड जाईल. पुढील वर्ष २६ सप्टेंबरपासून बँकेच्या स्थापनेचे शतकमहोत्सवी वर्ष सुरू होत असून, त्या आधी हे महत्त्वाचे व्यावसायिक टप्पे बँकेच्या परिवाराच्या दृष्टीने उत्साहवर्धक ठरतील, असे नाडकर्णी यांनी सांगितले.
शेठ शांताराम मंगेश कुलकर्णी यांनी स्थापित केलेल्या या बँकेच्या ९८व्या स्थापना दिनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यानिमित्ताने बँकिंग व्यवसायात फौजदारी कायद्याची भूमिका या विषयावर माजी मुख्य सरकारी वकील रामनाथ किणी यांचे भाषण झाले. स्थापनादिनी तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानाची एनकेजीएसबी बँकेची मोठी परंपरा राहिली असून, या व्याख्यानमालेत आजवर द. रा. पेंडसे, प्रा. मधु दंडवते, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, अरुण जेटली, सुरेश प्रभू, व्ही. लीलाधर, रुपा रेगे-नित्सुरे आदींची भाषणे झाली आहेत.
शतकमहोत्सवी वर्षांसाठी बँकेकडून अनेक कार्यक्रमांची आखणी सध्या सुरू असून, नवीन बोधचिन्ह, महाराष्ट्राबाहेर नवीन राज्यात विस्तार आणि मोठी व्यावसायिक झेप घेण्याचे लक्ष्यही निर्धारित केले जात असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले.