* मकरंद जोशी

कोविड-१९ म्हणजे करोनाने आपल्यावर म्हणजे अख्ख्या मानवजातीवर जोरदार आक्रमण केले आहे आणि तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकाने आपल्या घरी किंवा जिथे असू तिथे थांबावे याला पर्याय नाही. दळणवळण जरी थांबले असले तरी उद्योजकाच्या उत्तरदायित्त्वात फारसा फरक पडलेला नव्हता. परंतु रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या आठवडय़ात दिलासा दिला.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयानुसार, कुठलाही उद्योग आर्थिक देणी बँकेला देऊ शकली नाही तरी तो थकबाकीदार (defaulter)) धरला जाणार नाही. हा नियम ३ महिने शिथिल झाला आहे. ही शिथिलता असली तरी बाकीच्या उत्तरदायित्त्वातून सुटका नाही. उदा. कर्मचाऱ्यांचा पगार, भाडे, वस्तू व सेवा कर (GST), पुरवठादारांची देणी इत्यादी.

मागील लेखात आपण पाहिले की, उद्योगांची आर्थिक क्षमता मजबूत असणे खूप गरजेचे आहे. आणि या काळात उद्योगाचे प्राधान्य उद्योग वाचवणे हे आहे.

उद्योग वाचवणे म्हणजे काय?

१) उद्योगाची मालमत्ता वाचवणे

२) उद्योगाचे संबंध वाचवणे आणि मजबूत करणे

हा काळ ओसरेपर्यंत उद्योगात टिकाव धरणे आवश्यक आहे. त्या निमित्ताने काही विचार –

खर्चाबद्दलच्या उत्तरदायित्त्वात विलंब :

उद्योगाकडे असलेली रोकड जास्तीत जास्त टिकणे आवश्यक आहे. ती रोकड सांभाळून खर्च करणे स्वाभाविक आहे. कुठल्याही उद्योगात परस्परावलंबित्त्व असते. आपण आपल्या कर्मचारी व पुरवठादारांवर अवलंबून आहोत तसेच आपला ग्राहक आपल्यावर अवलंबून आहे हे भान ठेवून कुठलेही संबंध न दुखावता आपल्या खर्चात जितके शक्य असेल तितका विलंब करणे आवश्यक आहे.

बँक, वित्त संस्थाबद्दलची देणी :

ती देणी फेडण्यात उशीर झाला तर तुम्ही थकबाकीदार (defaulter) होणार नाही. त्यामुळे ते पैसे वाचवण्याकडे कल राहणार आहे. ते करत असताना संवाद टिकवणे आवश्यक आहे. हे करत असताना आपल्या कायदेशीर सल्लागारांचा सल्लाही घेणे आवश्यक आहे.

Force Majeure (फोर्स मेजर) :

आपण आपल्या सर्व कायदेशीर कागदपत्रांची नीट तपासणी करणं आवश्यक आहे. आपल्या करारात Force Majeure (फोर्स मेजर) चा संदर्भ दिला आहे का? कोरोना ही जागतिक महामारी आहे आणि सर्वत्र लॉकडाऊन (टाळेबंदी) आहे. त्यामुळे कुठल्याही कराराची पूर्तता करणे अशक्य बनले आहे. त्या कराराची अंमलबजावणी कायदेशीररित्या होऊ  शकत नाही. हे आपल्या उद्योगाला अपकारक किंवा उपकारक काहीही असू शकते. आपल्या सल्लागारांचा सल्ला घ्यावा आणि त्याबद्दल अधिक माहिती घ्या.

विमा कवच/सुरक्षा :

आपल्या मालमत्तेची सुरक्षा व्यवस्थित काम करत आहे ना याची शहानिशा करून घ्या. आपला विमा कुठल्या जोखीमेची काळजी घेतो हेदेखील बघून घ्या.

संधी :

जे उद्योग वैद्यकीय उपकरणे, पलंग, सॅनिटायझर, मास्क बनवण्याच्या उद्योगात आहेत त्याच्यासाठी हे संकट खरे दर सेवा करण्याची संधी घेऊन आले आहे. तसेच आपल्या आजूबाजूच्या लोकांच्याबद्दल उरफमार्फत (कंपनी सामाजिक बांधिलकी) काळजी घेण्याची ही संधी आहे.

घरून काम करताना :

संशोधन व कौशल्य विकास, संबंध सुधार, आरोग्याची काळजी, छंद जोपासणे, घरच्यांना वेळ देणे, पाककृतीत हात आजमावणे या गोष्टींची संधी आपल्याला यानिमित्ताने मिळाली आहे, असे मानावे. ती आपण जरूर साधावी. ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी तर ही एक खूप मोठी संधी आहे.

सामाजिक उत्तरदायित्त्व :

उद्योजक हा कुठल्याही समाजाचा कणा असतो. कारण तो हजारोंचा पोशिंदा असतो. आणि या संकटाच्या काळातही त्याच्याकडून त्याला साजेशा वर्तनाची अपेक्षा त्याची स्वत:ची आणि समाजाची असते. ती जबाबदारी पार पडून आपल्या पदरी थोडे पुण्य पाडून घेण्याची ही वेळ आहे. तसेच आपल्या उद्योगाबद्दल ची कटअ‍ॅए बनवण्याची संधी आणि जबाबदारी आहे.

आजूबाजूला परिस्थिती नकारात्मक असली तरीही उद्योजकाने शांत आणि सकारात्मक राहणे आणि आपल्या आजूबाजूंच्या लोकांना यात मदत करणे ही उद्योजकाचीच जबाबदारी आहे कारण सर सलामत तो पगडी पचास!

(लेखक कंपनी सचिव आहेत.)

makarandjoshi@mmjc.in