सायरस मिस्त्री अथवा शापूरजी पालनजी समूहाने जरी टाटा समूहापासून वेगळे होण्याची प्रसिद्धीपत्रक काढून घोषणा केली असली तरी, तसा पूर्ण फारकतीचा कोणताही औपचारिक प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही, असा खुलासा टाटा सन्सकडून गुरुवारी करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने २२ सप्टेंबरला शापूरजी पालनजी समूहाला त्यांच्या हाती असलेल्या टाटा सन्सच्या भागभांडवलाला तारण ठेवून निधी उभारण्यास परवानगी नाकारणारा आदेश दिल्यानंतर, या समूहाने टाटा समूहापासून पूर्ण फारकत घेण्याची वेळ आली आहे, असे प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले. ‘‘त्यांच्या या विधानाने बरीच गोंधळाची स्थिती निर्माण करण्यासह, प्रसिद्धीमाध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा आणि अटकळींना वाव मिळवून दिला आहे,’’ असे टाटा सन्सने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शापूरजी पालनजी आणि टाटा समूहातील संबंध ७० वर्षे जुने आहेत. हा समूह टाटा सन्समधील सर्वात मोठा अल्पसंख्य भागधारक असून, त्यांची १८.३७ टक्के भागभांडवलावर मालकी आहे. ढोबळ अंदाजानुसार या भागभांडवली हिश्शाचे मूल्यांकन १ लाख कोटी रुपयांच्या घरात जाणारे आहे. मात्र, ‘भागभांडवल विकून विभक्त होण्यासंदर्भात अद्याप तरी शापूरजी पालनजी समूहाकडून कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नाही,’ असे टाटा समूहाचे म्हणणे आहे.

टाटा सन्सचे समभाग तारण ठेवून निधी उभारण्याच्या शापूरजी पालनजी समूहाच्या योजनेवर टाटा सन्सने आक्षेप नोंदवून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्रकरण न्यायप्रविष्ट असून, सर्वोच्च न्यायालयात यासंबंधाने २६ ऑक्टोबरला नियोजित सुनावणीची आपल्याला प्रतीक्षा असल्याचे टाटा समूहाने स्पष्ट केले आहे. तथापि मिस्त्री कुटुंबीयांच्या शापूरजी पालनजी समूहाकडील सर्व हिस्सा खरेदी करण्याची तयारी असल्याचे टाटा सन्सकडून न्यायालयाला आधी झालेल्या सुनावणीत सांगण्यात आले आहे.