मुंबई : भारतासारख्या देशात सर्रास कर्जमाफी होते. कंपन्यांच्या कर्जावरही पाणी सोडले जाते. मात्र सर्वसामान्य बँक खातेदारांच्या बचतीला संरक्षण मिळत नाही, अशा शब्दात एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी ताज्या ‘पीएमसी’ बँकेच्या घडामोडीवर भाष्य केले.

सर्वसामान्य माणसाची आयुष्याची मिळकत बँकांमध्ये जमा होते. मात्र त्या पैशाचा गैरवापर केला जातो. प्रामाणिक बँक खातेदारांच्या पूंजीचे संरक्षण करणारी व्यवस्था भारतच नव्हे तर जगभरात कुठेही नाही, असे पारेख यांनी नमूद केले.

भारतीय विद्या भवनच्या ‘एसपी जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च’ (एसपीजेआयएमआर) या संस्थेतर्फे ‘सेंटर फॉर फायनान्शिअल स्टडीज’चे (सीएफएस) गुरुवारी येथे झालेल्या कार्यक्रमात औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी पारेख बोलत होते. स्टेट बँकेच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य याही या वेळी उपस्थित होत्या.

‘पीएमसी’ बँकेच्या संतप्त खातेदारांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना गुरुवारी मुंबईत लक्ष्य केल्यानंतर अर्थमंत्र्यांनीही याबाबत ठोस नियमन व्यवस्थेसाठी कायदा दुरूस्तीचे आश्वासन दिले. त्याच वेळी मुंबईतील अन्य एका कार्यक्रमात पारेख यांनी व्यवस्थेतील महत्वाच्या उणीवेवर बोट ठेवले.

कर्जमाफी, कर्ज निर्लेखनासारखी व्यवस्था आपण पोसतो; मात्र बँक व्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असलेल्या सामान्य खातेदारांच्या हितरक्षणाची कडेकोट व्यवस्था निर्माण करू शकलेलो नाही, असे पारेख यांनी खेदाने सांगितले.

भारताच्या वित्तीय व्यवस्थेने पुन्हा विश्वासार्हता कमावली पाहिजे, या आवाहनासह पारेख यांनी नैतिकता आणि मूल्य संस्कृतीला आपण कधीच गमावता कामा नये, असे सांगितले.

बँकेत बचत करणाऱ्या बँक खातेदारांचे अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान असून कमी व्याजदर मिळूनही केवळ सुरक्षितता व धनरक्षणासाठी त्यांच्याकडून हा पर्याय स्वीकारला जातो, असे नमूद करत पारेख यांनी त्यांच्या पूंजीचे योग्यरीत्या संरक्षण होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

सिटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य अर्थतज्ज्ञ समीरन चक्रवर्ती, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी निमेश शहा, कॅटॅलिस्ट अ‍ॅव्हायजर्स एलएलपीचे केतन दलाल, मॅकेन्झी अ‍ॅण्ड कंपनीचे वरिष्ठ भागीदार आलोक क्षीरसागर, एसपीजेआयएमआरचे सहयोगी प्राध्यापक (वित्त) अनंत नारायण, एसपीजेआयएमआरचे कार्यकारी हर्षवर्धन आणि सीएनबीसी टीव्ही १८च्या लता वेंकटेश आदी या वेळी उपस्थित होते. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे माजी विभागीय मुख्याधिकारी आणि ‘एसपीजेआयएमआर’मधील वित्त विषयाचे प्राध्यापक नीरज स्वरूप यांच्याकडे सीएफएसच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे.