वाढीव कर संकलनाच्या बळावर अर्थमंत्र्यांचा दावा

देशातील प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष कर संकलनात दुहेरी अंकातील वाढ हे निश्चलनीकरणामुळे अर्थव्यवस्थेत मंदी नसल्याचे चित्र स्पष्ट करत असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी केला.

निश्चलनीकरणाच्या कालावधीत गेल्या महिन्यात उत्पादन शुल्क ३१.६ टक्क्य़ांनी वाढल्याचा उल्लेख जेटली यांनी यावेळी केला. निर्मिती क्षेत्राशी निगडित ही कर वर्गवारी असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

डिसेंबरमध्ये सेवा करातील मिळकत १२.४ टक्क्य़ांनी वाढली होती. सीमाशुल्क महसूल मात्र ६.३ टक्क्य़ांनी घसरले आहे. वाढत्या सोने आयात घसरणीमुळे हे झाल्याचे मानले जाते.

कर संकलनातील आकडेवारी ही प्रत्यक्षातील असून ती अंदाजित केलेली नाही, असे नमूद करत अर्थमंत्र्यांनी ५० दिवसांच्या निश्चलनीकरणामुळे देशात आर्थिक मंदीचे चित्र आहे, असे यावरून सिद्ध होत नाही, असा दावा यावेळी केला.

देशाच्या प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष कर संकलनात चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये वाढ झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. २०१६-१७ मधील एप्रिल ते डिसेंबर दरम्यान प्रत्यक्ष कर १२.०१ टक्क्य़ांनी वाढून ५.५३ लाख कोटी रुपये झाले आहे. तर अप्रत्यक्ष कर तब्बल २५ टक्क्य़ांनी झेपावत ६.३० लाख कोटी रुपये झाले आहे.

या दरम्यान उत्पादन शुल्क ४३ टक्क्य़ांनी (२.७९ लाख कोटी रुपये), सेवा कर २३.९ टक्के (१.८३ लाख कोटी रुपये) तर सीमाशुल्क ४.१ टक्क्य़ांनी (१.६७ लाख कोटी रुपये) वाढले आहे. अप्रत्यक्ष करांमध्ये वार्षिक तुलनेत १४.२ टक्के वाढ झाली आहे.

निश्चलनीकरणाच्या कालावधीत अनेक राज्यातील मूल्यवर्धित कर संकलनही लक्षणीय वाढल्याचा दाखला अर्थमंत्र्यांनी यावेळी दिला.