राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या दणदणीत पराभवाच्या परिणामी सरकारच्या आर्थिक सुधारणा राबवण्याचा निर्धार तसूभर ढळणार नाही आणि या आघाडीवरील धडाका सुरूच राहील, असे ठाम प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी येथे केले.
ज्या आर्थिक सुधारणा सरकार राबवू पाहत आहे त्यातून गुंतवणूक वाढेल, रोजगारनिर्मिती होईल आणि लोकांचे जीवनमानही उंचावेल, जे देशातील गरिबी निर्मूलनासाठी मदतकारकच ठरेल, असा विश्वास जेटली यांनी अमेरिका-भारत आर्थिक आणि वित्तीय भागीदारी परिषदेत बोलताना व्यक्त केला. यासमयी अमेरिकेचे वित्तीय मंत्री जॅक लेव हेही उपस्थित होते. राजधानीतील दारुण पराभवानंतर केंद्रातील सरकारला राजकीय अपरिहार्यतेपोटी लोकानुनय करणाऱ्या लोकप्रिय योजनांचा माग घ्यावा लागेल, असा तर्कवितर्काना विराम देणारा निर्वाळा जेटली यांनी हे भाष्य करून दिला.
ते म्हणाले, ‘जेथे चार निवडणुका जिंकल्या जातात आणि एका निवडणुकीत अपेक्षित यश मिळत नाही याचा अर्थ आम्ही निवडलेल्या मार्गावरची वाटचाल धिमी करावी, असा होत नाही.’ देशातील मोठय़ा प्रमाणात असलेले दारिद्रय़ कमी करणारा कार्यक्रम आणि सामाजिक योजना राबवायच्या झाल्यास भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ बनायला हवी आणि हे आर्थिक सुधारणा राबवूनच शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.